लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : लॉर्ड्सवरील झालेल्या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे. पण दुसरीकडे या विजयासह पाकिस्तान विश्वचषकाच्या रेसमध्ये कायम राहीला आहे. पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेपुढे ३०९ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हाचा यशस्वीपणे पाठलाग दक्षिण आफ्रिकेला करता आला नाही आणि त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ३०८ धावा केल्या आहेत. बाबर आझम आणि हारिस शेख यांनी दमदार अर्धशतकी खेळी साकारल्यामुळेच पाकिस्तानला तिनशे धावांचा आकडा पार करता आला.
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. पाकिस्तानने यावेळी ८१ धावांची सलामी दिली. पण त्यानंतर १६ धावांमध्ये हे दोन्ही सलामीवीर बाद झाले. या दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडले ते ताहिरने. पाकिस्तानचा सलामीवीर फझर झमानला ताहिरने पहिल्यांदा बाद केले. त्यानंतर ताहिरने इमाम उल हकचा काटा काढला. पण इमाम उल हकला बाद केल्यावर ताहिरने इतिहास रचला.
पाकिस्तानने दोन्ही फलंदाज बाद झाल्यावर बाबर आझमने संघाचा धावफलक हलता ठेवला. आझमने ८० चेंडूंत सात चौकारांच्या जोरावर ६९ धावा केल्या. आझम आणि हारिस यांची भागीदारी यावेळी चांगलीच रंगली होती. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी रचली. पण यानंतर आझम बाद झाला. आझम बाद झाल्यावर हारिसने जोरदार हल्ले गोलंदाजीवर चढवले. हारिसने ५९ चेंडूंत ९ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ८९ धावांची धडाकेबाज खेळी साकारली.
इम्रान ताहिरने या सामन्यात दोन विकेट्स मिळवत इतिहास रचला. आतापर्यंत विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक बळी मिळवण्याचा विक्रम वेगवान गोलंदाज अॅलन डोनाल्डच्या नावावर होता. आतापर्यंत डोनाल्डने विश्वचषकात सर्वाधिक ३८ बळी मिळवले होते. पण या सामन्यात ताहिरने दोन बळी मिळवत विश्वचषकात एकूण ३९ बळी मिळवण्याची किमया साधली आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक बळी मिळवण्याचा विक्रम आता ताहिरच्या नावावर झाला आहे.