लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : दक्षिण आफ्रिका संघाला वर्ल्ड कप स्पर्धेत रविवारी बांगलादेशकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागला. नावाजलेले फलंदाज व गोलंदाज संघात असूनही आफ्रिकेला हार मानावी लागल्यानं क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. आफ्रिकेचा हा वर्ल्ड कप स्पर्धेतील सलग दुसरा पराभव आहे आणि यापूर्वी एकदाच त्यांना अशा नामुष्कीचा सामना करावा लागला होता. पराभवाचे सत्र सुरु असताना त्यांना आणखी एक धक्का बसला आहे. संघातील प्रमुख गोलंदाज लुंगी एनगिडीला दुखापतीमुळे आठवडाभर विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात डाव्या पायूचे स्नायू ताणले गेल्यानं एनगिडीनं चार षटकांनंतर मैदान सोडले. त्यानंतर तो पुन्हा गोलंदाजी करायला आला नाही. त्याचा फटका आफ्रिकेला बसला आणि बांगलादेशने 330 धावा चोपून काढल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेला 309 धावाच करता आल्या आणि त्यांना 21 धावांनी पराभव पत्करावा लागला. याआधी सलामीच्या लढतीत त्यांना यजमान इंग्लंडकडून हार पत्करावा लागला होता. या दोन्ही सामन्यांत संघातील प्रमुख गोलंदाज डेल स्टेन खेळला नव्हता, परंतु तिसऱ्या सामन्यात त्याला खेळावे लागणार आहे.
दक्षिण आफ्रिका तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा सामना करणार आहे. बुधवारी होणाऱ्या या लढतीत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाचे पारडे जड आहे. त्यात एनगिडीच्या दुखापतीमुळे आफ्रिकेची डोकेदुखी वाढवली आहे. सलामीवीर हाशिम अमला या सामन्यात खेळेल की नाही, याबाबत साशंकता आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याला दुखापत झाली होती आणि त्यामुळे बांगलादेशविरुद्ध तो खेळला नव्हता.
एनगिडीला आठवडा ते 10 दिवसांच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला असून 10 जूनला होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात तो खेळण्याची शक्यता आहे.
Web Title: ICC World Cup 2019 : South Africa's Lungi Ngidi is expected to be out for a week to 10 days, not play against Team India
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.