लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : अविष्का फर्नांडोच्या शतकाच्या जोरावर श्रीलंकेने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात तिनशे धावांचा पल्ला पार केला. अविष्काचे शतक आणि कुशल परेराच्या अर्धशतकाच्या जोरावर श्रीलंकेला प्रथम फलंदाज करताना 338 धावांपर्यंत मजल मारता आली.
वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून श्रीलंकेला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. श्रीलंकेच्या दिमुथ करुणारत्ने आणि परेरा यांनी यावेळी 93 धावांची दमदार सलामी दिली. वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरने यावेळी करुणारत्नेला बाद करत श्रीलंकेला पहिला धक्का दिला. यानंतर काही वेळातच परेराही बाद झाला. परेराने 51 चेंडूंत 8 चौकारांच्या जोरावर 64 धावा केल्या.
दोन्ही सलामीवीर काही फरकाच्या अंतरावर बाद झाल्यामुळे श्रीलंकेचा डाव आता लवकर आटोपणार, असे काही जणांना वाटत होते. पण अविष्काने यावेळी शतक झळकावत श्रीलंकेच्या संघाला तिनशे धावांचा पल्ला गाठून दिला. अविष्काने 103 चेंडूंत 9 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 104 धावा केल्या. अविष्काचे हे पहिलेच शतक ठरले.