लीड्स, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : श्रीलंका संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीचे सत्र शुक्रवारीही कायम राहिले. अँजेलो मॅथ्यूजची एकाकी झुंजीच्या जोरावर श्रीलंकेने यजमान इंग्लंडसमोर 233 धावांचे लक्ष्य ठेवले. मार्क वूड व जोफ्रा आर्चर यांनी भेदक गोलंदाजी करताना श्रीलंकेला निर्धारीत 50 षटकांत 9 बाद 232 धावा केल्या. मॅथ्यूज 114 चेंडूंत 85 धावांवर नाबाद राहिला.
यजमान इंग्लंडविरुद्ध नाणेफेकीचा कौल बाजूला लागल्यानं श्रीलंकेने मोठ्या धाडसानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, दिमुथ करूणारत्ने आणि कुशल परेरा हे दोन्ही सलामीवीर अवघ्या तीन धावांवर तंबूत परतले. जोफ्रा आर्चरने त्याच्या पहिल्याच षटकात श्रीलंकेला धक्का दिला. त्यानंतर ख्रिस वोक्सने परेराला (2) बाद केले. अविष्का फर्नांडो आणि कुशल मेंडीस यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून संघाला पुन्हा ट्रॅकवर आणले, परंतु मार्क वूडने ही भागीदारी तोडली. त्यानं 39 चेंडूंत 49 धावांची खेळी करणाऱ्या फर्नांडोला माघारी पाठवले.
मेंडीस आणि अँजेलो मॅथ्यू यांनी 71 धावांची भागीदारी करताना संघाला पुन्हा सुस्थितीत आणले. रशीद खानने इंग्लंडला यश मिळवून दिले. त्यानं मेंडीसला बाद केले. मेंडीसने 68 चेंडूंत 46 धावा केल्या. पुढच्याच चेंडूत जीवन मेंडीस शुन्यावर बाद झाला. रशीदची हॅटट्रीक मात्र हुकली. धनंजया डी'सिल्वा आणि मॅथ्यूज यांची 57 धावांची भागीदारी आर्चरने मोडीत काढली. धनंजया 29 धावांवर माघारी परतला. मॅथ्यूजने वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वात संथ अर्धशतक झळकावण्याचा विक्रम नावावर केला. त्याने 84 चेंडूंत 50 धावा केल्या.