लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : फलंदाजांनी हाराकिरी केली असली तरी भेदक गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेने पहिला विजय साकारला. अफगाणिस्तानबरोबरची त्यांची लढत चांगलीच अटीतटीची झाली. पण अखेर श्रीलंकेने यावेळी डकवर्थ-लुईस नियमांनुसार 34 धावांनी विजय मिळवला. डकवर्थ-लुईस नियमांनुसार अफगाणिस्तानपुढे 187 धावांचे आव्हान ठेवले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करण्यात अफगाणिस्तानचा संघ अपयशी ठरला.
श्रीलंकेच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची चांगली सुरुवात झाली नाही. कारण त्यांना पाचव्या षटकापासून धक्के बसायला सुरुवात झाली. सलामीवीर हझरतुल्लाह झाझईने 30 धावा करत संघाला स्थैर्य मिळवून द्यायचा प्रयत्न केला खरा, पण त्यालाही मोठी खेळी साकारता आली नाही. अफगाणिस्तानचे फलंदाज ठराविक फरकाने बाद होत राहिले आणि कमी धावसंख्या असूनही श्रीलंकेच्या हातामध्ये सामना आला होता. श्रीलंकेच्या नुवान प्रदीपने यावेळी भेदक मारा करत 31 धावांमध्ये चार फलंदाजांना बाद केले. अफगाणिस्तानचा कर्णधार नजिबुल्लाह झारदानने 43 धावांची खेळी साकारली, पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही.
दमदार सुरुवातीनंतर श्रीलंकेचा डाव गडगडला आणि त्यामुळेच त्यांना 201 धावांवर समाधान मानावे लागले. पावसामुळे हा सामान 41 षटकांचा करण्यात आला आणि अफगाणिस्तानपुढे 187 धावांचे आव्हान ठेवण्यात आले. एकेकाळी श्रीलंकेची 1 बाद 144 अशी स्थिती होती. पण त्यानंतर त्यांच्या फलंदाजांनी हाराकिरी केली आणि त्यांना अफगाणिस्तानपुढे 202 धावांचे आव्हान ठेवता आले. अफगाणिस्तानकडून मोहम्मद नबीने अचूक मारा करत श्रीलंकेच्या चार फलंदाजांना माघारी धाडले.
अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत श्रीलंकेच्या फलंदाजांना 22 षटकांनंतर पळता भूई थोडी करून सोडले होते. कारण श्रीलंकेचा सलामीवीर कुशल परेराने 78 धावांची खेळी साकारली. त्याला दिमुथ करुणारत्ने (30) आणि लहिरु थिरीमाने (25) यांनी चांगली साथ दिली होती. पण त्यानंतर मात्र श्रीलंकेच्या फलंदाजांना जास्त काळ खेळपट्टीवर गत धरता आला नाही. श्रीलंकेच्या तीन फलंदाजांना यावेळी भोपळाही फोडता आला नाही.