कार्डिफ, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्हन स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांनी केलेले कृत्य क्रिकेटला काळीमा फासणारे होते. या तिघांवर चेंडूशी छेडछाड करण्याचा आरोप ठेवण्यात आला आणि तिघांनाही क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शिक्षा सुनावली. स्मिथ व वॉर्नर हे वर्षभर क्रिकेटपासून दूर होते, तर बॅनक्रॉफ्ट नऊ महिने... या पलिकडे स्मिथ व वॉर्नर यांनी ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व कधीच करता येणार नाही, असा ऐतिहासिक निर्णयही सुनावण्यात आला. पण, हा निर्णय झुगारून स्मिथ वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करताना दिसत आहे. जाणून घेऊया...
कठीण प्रसंगी संयमी खेळ करताना संघाला कसं तारायचं हे स्मिथकडून शिका, कर्णधार जेसन होल्डरने वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना दिलेला हा सल्ला. 4 बाद 38 धावा अशी दयनीय अवस्था ऑस्ट्रेलियाची कदाचित यापूर्वी कधी झाली असावी. डेव्हिड वॉर्नर, अॅरोन फिंच, उस्मान ख्वाजा आणि ग्लेन मॅक्सवेल हे मात्तबर फलंदाज माघारी गेल्यानंतर ऑस्ट्रेलियाचं काही खरं नाही असंच सर्वांना वाटले होते. पण, स्मिथ नावाचा अनुभवी व चतुर फलंदाज मैदानावर होता. त्याच्या धावा आणि चेंडू यांची तफावत पाहून त्याचा खेळ संथ वाटेल, परंतु त्यामुळेच ऑस्ट्रेलियाच्या अन्य फलंदाजांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला आणि त्यामुळेच ऑस्ट्रेलियाने 288 धावांपर्यंत मजल मारली.
लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजचा डाव सुरू होण्यापूर्वी स्मिथने आणखी एक भूमिका बजावली आणि ती म्हणजे कर्णधाराची. त्याने खेळाडूंना स्पिरीट स्पीच दिले. त्याच्या त्या भाषणामुळे खेळाडू चार्ज अप झाले आणि ऑस्ट्रेलियाने हा सामना 15 धावांनी जिंकून विजयी मालिका कायम राखली. कर्णधार म्हणून फिंच असला तरी पडद्यामागचा कर्णधार हा स्मिथच आहे. सामना सुरू असताना फिंच अधुनमधुन स्मिथचाही सल्ला घेताना दिसला. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा डाव सुरू असताना सहकारी फलंदाजांना तो चेंडूची दिशा समजावून सांगत होता आणि त्याप्रमाणे खेळण्याचा सल्ला देत होता. त्यामुळेच अॅलक्स कॅरी ( 45) आणि नॅथन कोल्टर नील ( 92) यांनी मोठी खेळी करत संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. या दोघांसोबत स्मिथनं अनुक्रमे 68 व 102 धावांची भागीदारी केली.
शे होप ( 68), निकोलस पूरण ( 40) आणि जेसन होल्डर (51) यांच्यासह अन्य खेळाडूंनी छोटेखानी खेळी करताना विंडीजला विजयासमीप आणले होते. पण, तेथेही स्मिथनं खोडा घातला. त्यानं फिंचच्या मदतीनं डावपेच आखले आणि त्यात विंडीजचे खेळाडू अडकले आणि ऑस्ट्रेलियानं गमावलेला विजयाचा घास पुन्हा मिळवला. बंदी उठल्यानंतर स्मिथ व वॉर्नर संघात कमबॅक करणार हे ऑस्ट्रेलियासाठी शुभसंकेतच होते. केवळ फलंदाजीतचं नव्हे, तर अनुभवाचा आणि स्मिथच्या चातुर्याचा संघाला फायदा होणार आहे. त्याची प्रचिती येत आहेच आणि राहिलही...