लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. बुधवारी मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्डवर झालेल्या या सामन्यात टीम इंडियाला न्यूझीलंडकडून 18 धावांनी हार पत्करावी लागली. पण, स्पर्धेतून पॅकअप झाले असले तरी भारतीय संघाला 14 जुलैपूर्वी लंडन सोडता येणार नाही. विराट कोहली अन् टीमला वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत लंडनमध्येच मुक्काम करावा लागणार आहे. असं का, चला जाणून घेऊया...
वर्ल्ड कप स्पर्धा आता आयपीएल फॉरमॅटमध्ये खेळवा, विराट कोहलीचा पर्याय
उपांत्य फेरीतील पराभवानंतर कोट्यवधी भारतीय चाहत्यांचा हिरमोड झाला. पण, पराभवानंतरही टीम इंडियाला लंडनमध्येच नवा जेता ठरेपर्यंत थांबावं लागणार असल्यानं, चाहते अजून निराश झाले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( बीसीसीआय) खेळाडूंच्या परतीच्या तिकिटाची सोय करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे रविवारपर्यंत टीम इंडियाला मँचेस्टर येथेच थांबावे लागणार आहे. भारतीय क्रिकेटपटूंनी हॉटेल सोडलं असलं तरी ते रविवारपर्यंत शहरातच थांबणार आहेत. ''संघातील अनेक खेळाडू 14 जुलैपर्यंत मँचेस्टरमध्येच राहणार आहेत आणि तेथूनच मायदेशासाठी रवाना होतील. उपांत्य फेरीतच आव्हान संपुष्टात आल्यानंतर तिकीट बुक करण्यात आले,'' अशी माहिती बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं Quint या वेबसाईटशी बोलताना दिली.
वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीयस संघ वेस्ट इंडिय येथे होणाऱ्या कसोटी व मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. हा दौरा 3 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. काही खेळाडू मायदेशात परतणार आहेत, तर दोन आठवड्याची सुट्टी असल्यानं काही येथेच थांबतील. तिकिटांची सोय झाल्याप्रमाणे खेळाडू गटागटानं लंडन सोडतील, असेही बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले.
भारतीय संघासोबत महेंद्रसिंग धोनीची ही अखेरची स्पर्धा असल्याची चर्चा आहे. धोनी हा थेट रांची येथे जाणार आहे. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कोहलीला धोनीच्या निवृत्तीबद्दल प्रश्न विचारला. त्यावर कोहली म्हणाला,''निवृत्तीच्या निर्णयाबद्दल धोनीनं अजून तरी आम्हाला काही सांगितलेले नाही.'' किवींविरुद्ध धोनीनं 72 चेंडूंत 50 धावा केल्या. मार्टिन गुप्तीलच्या अचूक थ्रोमुळे त्याला धावबाद होऊन माघारी परतावे लागले. 23 डिसेंबर 2004मध्ये धोनी पहिल्या वन डे सामन्यातही धावबाद झाला होता.