ICC World Cup 2019 : धडा शिकवणारी हार; पण विराटसेना बोध घेणार?

इंग्लंडकडून झालेल्या भारतीय संघाच्या पराभवामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे विश्वचषकावर दावेदारी सांगणाऱ्या विराटसेनेला या पराभवातूने नेमका काय बोध घ्यावा लागणार आहे, हेही समोर दिसू लागले आहे. 

By बाळकृष्ण परब | Published: July 1, 2019 12:53 PM2019-07-01T12:53:19+5:302019-07-01T12:57:21+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019: Team India teach lesson from defeat against England | ICC World Cup 2019 : धडा शिकवणारी हार; पण विराटसेना बोध घेणार?

ICC World Cup 2019 : धडा शिकवणारी हार; पण विराटसेना बोध घेणार?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

यंदाच्या क्रिकेट वर्ल्डकपला सुरुवात झाल्यापासून अपराजित असलेल्या भारतात संघाला रविवारी जोरदार धक्का बसला. हा धक्का दिलाय तो विश्वचषकातून आव्हान संपण्याच्या मार्गावर असलेल्या यजमान इंग्लंडने. या धक्क्याची तीव्रता नेमकी किती आहे हे पुढे दिसेलच. पण भारतीय संघाच्या काल झालेल्या पराभवामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे विश्वचषकावर दावेदारी सांगणाऱ्या विराटसेनेला या पराभवातूने नेमका काय बोध घ्यावा लागणार आहे, हेही समोर दिसू लागले आहे. 

भारत आणि इंग्लंडचे संघ एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीच अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असल्याने  ही लढत चुरशीची होणार, अशी सर्वांची अपेक्षा होती.  पण नाणेफेकीचा कौल यजमानांच्या बाजूने लागला आणि बर्मिंगहॅममध्ये वेगळेच चित्र दिसू लागले. सलग पराभवांमुळे डिवचल्या गेलेल्या इंग्लिश संघाने बघता बघता 337 धावा कुटल्या. एकवेळ चारशेपर्यंत जाणारे इंग्लंडचे आव्हान 338 पर्यंत रोखले गेल्याने भारतीय संघाला विजयाची संधी दिसू लागली. आजच्या सुपरफास्ट क्रिकेटच्या जमान्यात 338 धावांचे आव्हान पार करणे अवघड नाही.  त्यात रोहित शर्मा,  विराट कोहली, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, महेंद्रसिंह धोनी आणि केदार जाधव अशी तगडी बॅटिंग असताना भारतीय संघ या आव्हानाचा किमान जोरदार पाठलाग करेल, शेवटपर्यंत झुंज देईल, असा अंदाज होता. 

पण  लोकेश राहुलला झालेल्या दुखापतीमुळे आपले चांगल्या सुरुवातीचे स्वप्न भंगले. जायबंदी असतानाही सलामीस आलेला राहुल आल्यापावली माघारी गेला. खरंतर दुखापतग्रस्त असतानाही त्याला सलामीला का पाठवले गेले, हा एक सवालच आहे. मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना सुरुवातच निराशाजनक झाल्याने रोहित शर्मा आणि विराट कोहलीला षटकांमागे सात धावांची गती अपेक्षित असताना कसोटीसारखा बचावात्मक खेळ करावा लागला. खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर विराट आणि रोहितने गिअर बदलला खरा, पण तोपर्यंत अपेक्षित धावगती कमालीची वाढली होती. विराट आणि रोहित खेळपट्टीवर असेपर्यंत विजयाची आस होती. मात्र सलग पाचव्या सामन्यात विराट अर्धशतक पूर्ण केल्यानंतर शतकी खेळी करण्यात अपयशी ठरला. तर  रोहितही यंदाच्या विश्वचषकातील तिसरे शतक फटकावून बाद झाला. इथूनच सामना आपल्या हातून निसटला. कारण आव्हानाचा रोहित आणि विराटने केलेल्या डावाच्या बांधणीवर कळस चढवण्यासाठी आवश्यक असलेली भक्कम मधली फळी आपल्याकडे नव्हतीच. 


खरंतर गेल्या काही काळापासून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघ विराट कोहली, रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्यावर कमालीचा विसंबून राहू लागलाय. त्यातील धवन जायबंदी होऊन विश्वचषकाच्या मध्यावरूनच माघारी परतलाय. मात्र रोहित आणि विराटच्या जबरदस्त फॉर्ममुळे विश्वचषकात आपली वाटचाल सुकर झालीय. तरीही अत्यंत कमकुवत मधली फळी ही आपल्यासाठी चिंतेची बाब ठरली आहे. अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या लढतीत आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर आपल्या मधल्या फळीचे पितळ उघडे पडले होते. आता इंग्लंडविरुद्धही तेच झालं. विराट आणि रोहितच्या खेळींमुळे आपण लढतीत कमबॅक केलं होतं. पण मधल्या फळीने पुन्हा दगा केला.

37 व्या षटकात जेव्हा रोहित बाद झाला तेव्हा सामन्यातील आपले आव्हान संपले नव्हते. पण मधल्या फळीने म्हणावी तशी आक्रमकता दाखवलीच नाही. विश्वचषकात संधी मिळालेला ऋषभ पंत पुन्हा एकदा बेजबाबदारपणे खेळला. हार्दिक पांड्याने सुरुवात चांगली केली, पण नंतर त्याचीही बॅट थंडावली. मोक्याच्या क्षणी आक्रमक खेळासाठी लौकिक असलेल्या केदार जाधवने निराशा केली. तर धोनीचा फिनिशर हा लौकिक कधीच इतिहासजमा झालाय, त्यामुळे त्याच्याकडून चमत्काराची अपेक्षा नव्हतीच. आता गेल्या काही काळापासून मधल्या फळीतील खेळाडूंना खेळण्याची फारशी संधी मिळाली नसल्याने असं होत असल्याचा दावा करण्यात येतोय, पण ही पळवाट आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तुम्ही सज्ज असलंच पाहिजे. शेवटच्या 10 षटकांत 104 धावा फटकावणे कठीण हे मान्यच आहे. पण किमान त्याच्या जवळ जायचा प्रयत्न तरी व्हायला हवा होता. मात्र धोनी आणि पांड्याने 40 ते 45 व्या षटकांदरम्यान तसा प्रयत्नच केला नाही. नंतर धोनीने केदार जाधवसोबत  अखेरची षटके खेळून काढण्याची औपचारिकता पार पाडली. त्यामुळे पराभव हा निश्चितच होता. 


आता स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात गुणतालिकेती एकंदरीत चित्र पहता विराट सेना उपांत्य फेरी गाठणार हे निश्चितच आहे. मात्र उपांत्य लढतीपूर्वी आपल्या संघामधील दोष समोर आलेत हेही चांगलेच झाले आहे. मात्र उपांत्य अंतिम फेरीचा थर चढून विश्वचषकाची हंडी फोडायची असेल, तर आपल्याला मधल्या फळीला थोडा भक्कमपणा आणि जबाबदार खेळ करून दाखवावा लागेल. नुसतं रोहित शर्मा आणि विराटवर अवलंबून वर्ल्डकप जिंकता येणार नाही. 

Web Title: ICC World Cup 2019: Team India teach lesson from defeat against England

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.