लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघाची विजयी मालिका अखेर रविवारी संपुष्टात आली. यजमान इंग्लंडने वर्ल्ड कप स्पर्धेतील रविवारच्या लढतीत 31 धावांनी विजय मिळवून स्पर्धेतील आव्हान टीकवून ठेवले. या विजयानंतरही इंग्लंडचा संघ उपांत्य फेरीत प्रवेश मिळवेलच याची खात्री नाही. कारण, अंतिम चारमधील स्थानावर शिक्कामोर्तब करण्यासाठी त्यांना उर्वरित एक सामना जिंकावा लागणार आहे. उपांत्य फेरीचे हे चित्र येत्या शनिवारी स्पष्ट होईलच. पण, तरीही भारतासमोर उपांत्य फेरीत कोणाचे आव्हान असेल याची उत्सुकता लागली आहे. चला तर जाणून घेऊया भारताला उपांत्य फेरीत कोणाचे आव्हान असेल...
रविवारी झालेल्या सामन्यात इंग्लंडच्या 337 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ 5 बाद 306 धावांपर्यंतच मजल मारू शकला. रोहित शर्मा ( 102), विराट कोहली ( 66) , हार्दिक पांड्या ( 45), महेंद्रसिंग धोनी ( 42) आणि रिषभ पंत ( 32) यांची खेळी व्यर्थ ठरली. जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी 160 धावांची विक्रमी भागीदारी करून इंग्लंडला धमाकेदार सुरुवात करून दिली होती. त्यांना जो रूट ( 44) आणि बेन स्टोक्स (79) यांनी धावांचा पाऊस पाडताना इंग्लंडला 337 धावांपर्यंत मजल मारून दिली. इंग्लंडने 10 गुणांसह आता अव्वल चौघांत एन्ट्री घेतली आहे. पण, तरीही त्यांचे स्थान कायम राहिल याची शास्वती नाही. इंग्लंडला अखेरच्या साखळी सामन्यात न्यूझीलंडवर विजय मिळवावा लागणार आहे. तर आणि तरच त्यांचा अंतिम चौघांत प्रवेश पक्का होईल.
या आठवड्यात साखळी फेरीचे सर्व सामने संपतील. ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे. त्यांना अखेरच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सामना करावा लागणार आहे. आफ्रिकेची कामगिरी पाहता ऑस्ट्रेलिया हा सामना जिंकून 16 गुणांसह अव्वल स्थानी कायम राहिल. त्यापाठोपाठ भारतीय संघ असेल. भारताला उर्वरित लढतीत बांगलादेश व श्रीलंका यांचा सामना करायचा आहे आणि या दोन्ही लढती जिंकून भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर राहिल. ऑस्ट्रेलियाला अखेरच्या लढतीत पराभव पत्करावा लागल्यास त्यांची दुसऱ्या स्थानी घसरण होईल आणि टीम इंडिया टॉप वर राहिल.
तिसऱ्या स्थानासाठी इंग्लंड व न्यूझीलंड यांच्यात चुरस असेल. साखळी फेरीच्या अखेरच्या सामन्यात हे दोन्ही संघ भिडणार आहेत आणि यांच्यातील विजेता तिसऱ्या स्थानावर झेप घेईल. हा सामना यजमान इंग्लंडसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे त्यांचा विजय झाल्यास ते 12 गुणांसह तिसऱ्या आणि न्यूझीलंड नेट रनरेटच्या जोरावर चौथ्या स्थानावर राहतील. न्यूझीलंडने विजय मिळवल्यास ते तिसऱ्या स्थानावर येतील आणि इंग्लंडला पाकिस्तानच्या पराभवाची प्रार्थना करावी लागेल. पाकिस्तानने अखेरच्या साखळी सामन्यात बांगलादेशवर मोठा विजय मिळवून नेट रनरेटमध्ये किवींना मागे टाकल्यास ते चौथ्या स्थानावर येतील.
अखेरच्या अशा होतील उपांत्य फेरीच्या लढती
- ऑस्ट्रेलिया जिंकल्यास - अव्वल स्थान कायम आणि चौथ्या स्थानावरील संघाशी मुकाबला
- पहिल्या उपांत्य सामन्यात - ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड किंवा पाकिस्तान असा सामना होईल
- ऑस्ट्रेलिया हरल्यास - दुसऱ्या स्थानी घसरण
- दुसऱ्या उपांत्य सामन्यात - ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड किंवा इंग्लंड
- भारत दोन्ही सामने जिंकल्यास - 15 गुणांसह दुसऱ्या स्थानी, पण ऑस्ट्रेलिया हरल्यास अव्वल स्थानी झेप
- न्यूझीलंड जिंकल्यास - 13 गुणांसह तिसऱ्या स्थानी
- दुसऱ्या उपांत्य सामन्यात - न्यूझीलंड विरुद्ध भारत किंवा ऑस्ट्रेलिया
- इंग्लंड जिंकल्यास - 12 गुणांसह तिसऱ्या स्थानी
- दुसऱ्या उपांत्य सामन्यात - इंग्लंड विरुद्ध भारत किंवा ऑस्ट्रेलिया
- पाकिस्तान जिंकल्यास आणि इंग्लंड हरल्यास
- पाकिस्तान चौथ्या स्थानावर येईल आणि अव्वल स्थानावर असलेल्या संघाशी त्यांचा सामना होईल
Web Title: ICC World Cup 2019 : Team India will face 'This' team in World Cup Semi; know mathematics
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.