लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेत विजयी सलामी दिली. रोहित शर्माच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला. वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचा दुसरा सामना गतविजेत्या ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. भारतासाठी हा सामना सोपा नक्की नसेल, त्यामुळे भारतीय संघाला कंबर कसावी लागणार आहे. रविवारी भारतीय संघ बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी सामना करणार आहे. पण, या सामन्यासाठी भारतीय संघाला शुक्रवारी सराव करता आला नाही.
रोहित शर्माचे नाबाद शतक आणि युजवेंद्र चहलच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने विजयी सलामी दिली. भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला प्रथम फलंदाजी करताना 227 धावा करता आल्या. भारताने हे आव्हान सहा विकेट्स राखत पूर्ण केले. दक्षिण आफ्रिकेला पराभवाची हॅट्ट्रिक पत्करावी लागली. रोहितने 13 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद 122 धावांची खणखणीत खेळी साकारली. या सामन्यातील विजयानंतर मनोबल उंचावलेला भारतीय संघ रविवारी ऑस्ट्रेलियाचा सामना करणार आहे.
लंडन येथे होणाऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला पावसामुळे सराव करता आला नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीपूर्वीही पावसानं भारताच्या सराव सत्रावर पाणी फिरवलं होतं. ऑस्ट्रेलियाचा संघ सलग 10 वन डे सामने जिंकला आहे. त्यांनी भारतात टीम इंडियावर 0-2 अशा पिछाडीवरून 3-2 असा विजय मिळवला होता. त्यानंतर पाकिस्तानला पाचही वन डे सामन्यांत पराभूत केले होते. वर्ल्ड कप स्पर्धेतही ऑस्ट्रेलियाने विजयी घोडदौड कायम राखत अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजला नमवले.