- बाळकृष्ण परब
काल क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्सवर जे काही घडले त्याचे वर्णन करायला अदभूत, अविश्वसनीय हे शब्दही कमी पडतील. महान अनिश्चिततेचा खेळ असे क्रिकेटला का म्हटले जाते याचा अनुभव लॉर्ड्सवर खेळत असलेले इंग्लंड आणि न्यूझीलंडचे खेळाडू, प्रत्यक्ष मैदानात उपस्थित असलेले प्रेक्षक आणि जगभरात दूरचित्रवाणीवरून ही लढत पाहत असलेल्या कोट्यवधी क्रिकेटप्रेमींनी घेतला. कुणी कल्पनाही केली नसेल अशी अंतिम लढत रंगली. कुठला संघ जिंकला नाही की कुणी हरलं नाही. अखेरीस डबल टाय झालेल्या लढतीत चौकार षटकारांच्या अधिक्यावरून विश्वविजेता ठरला.
महत्त्वाचं म्हणजे येता जाता क्रिकेटला नावं ठेवणाऱ्या आणि विनाकारण उणीदुणी काढणाऱ्यांची बोलती बंद करण्याचं काम या लढतीने केलंय. या खेळाला खेळांचा राजा का म्हटलं जातं, या खेळामधील थरार कुठल्या थराला जाऊ शकतो, याचा प्रत्यय अशा मंडळींनी घेतला असेल.
खरंच ही अंतिम लढत 'भुतो न भविष्यति:' अशीच होती. ती क्रिकेटप्रेमींच्या दीर्घकाळ स्मरणात तर राहणार आहेच. सोबतच खेळ म्हणून क्रिकेटच्या पुढील वाटचालीवरही परिणाम करणार आहे. क्रिकेटची गंमत म्हणजे हा खेळ भल्या भल्यांची गणिते चुकवतो. अनेकांना काही वेळात हवेत पोहोचवतो तर काहींना जमिनीवरही आणतो. त्याचं चालतं बोलतं उदाहरण म्हणजे अंतिम लढतीतील हीरो ठरलेला बेन स्टोक्स. बरोब्बर सव्वातीन वर्षांपूर्वी याच बेन स्टोक्सने टाकलेल्या शेवटच्या षटकात कार्लोस ब्रेथवेटने सलग चार षटकार ठोकल्याने टी-20 विजेतेपद इंग्लंडच्या हातून निसटले होते. पण आज नशिबाची साथ इंग्लंड आणि ला मिळाली. सुरुवातीला बेन स्टोक्सचा टिपलेला झेल बोल्टचा पाय सीमारेषेला लागल्याने षटकार ठरला. तर शेवटच्या षटकार गप्टिलचा थ्रो त्याच्या बँटला लागून थेट सीमारेषेपार गेला. निर्णायक क्षणी हे बँटलक इंग्लंडसाठी टर्निंग पॉईंट ठरले.