ठळक मुद्देलिस्ट ‘ए’ मधील विक्रम, कसोटीतही केलीय अशी कामगिरी
ललित झांबरे : विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडविरुध्द दिमुथ करूणारत्ने याने आज कर्णधाराची खेळी केली आणि एक बाजू नेटाने लावून धरत तो शेवटपर्यंत नाबाद राहिला. श्रीलंकेच्या १३६ धावात ५२ धावा त्याच्या एकट्याच्या राहिल्या पण त्यापेक्षाही विशेष म्हणजे तो श्रीलंकेचे दहाच्या दहा गडी बाद होत असताना सलामीला येऊन तो शेवटपर्यंत नाबाद राहिला.
‘कॅरिंग दी बॅट थ्रू’ करणारा तो विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील केवळ दुसराच आणि वन डे क्रिकेटच्या इतिहासातील बारावा फलंदाज ठरला. मात्र लिस्ट ‘ए‘ क्रिकेटमध्ये तीन वेळा ‘कॅरिंग दी बॅट’ करणारा तो पहिलाच फलंदाज आहे. एवढेच नाही तर त्याने कसोटी क्रिकेटमध्येही ‘कॅरिंग दी बॅट’ची कामगिरी केली आहे.
विश्वचषक स्पर्धेत त्याच्या आधी वेस्ट इंडिजच्या रिडली जेकब याने आॅस्ट्रेलियाविरुध्द नाबाद ४९ धावांची ‘कॅरिंग दी बॅट थ्रू’ खेळी केली होती. अर्थात जेकब आणि करुणारत्ने दोघेही आपल्या संघाचा पराभव टाळू शकले नाहीत. न्यूझीलंडविरुध्द वन डे सामन्यात दुसºयांदा कुणी फलंदाजाने हा पराक्रम केलाय. याआठी आॅस्ट्रेलियाच्या डेमियन मार्टिनने २००० मध्ये आॅक़लंडच्या सामन्यात नाबाद ११६ धावांची ‘कॅरिंग दी बॅट थ्रू’ खेळी केली होती.
कसोटी आणि वन डे अशा दोन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये ‘कॅरिंग दी बॅट थ्रू’ करणारा तो केवळ सहावाच फलंदाज आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये करुणारत्नेच्या आधी झिम्बाब्वेचा ग्रँट फ्लॉवर, पाकिस्तानचा सईद अन्वर , इंग्लंडचा अॅलेक स्ट्युअर्ट, बांगलादेशचा जावेद ओमार आणि न्यूझीलंडचा टॉम लॅथम यांनी ही कामगिरी केली आहे.
करुणारत्नेने जुलै २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या गॉल कसोटीत नाबाद १५८ धावांची खेळी करताना ‘कॅरिंग दी बॅट’चा पराक्रम केला होता. त्यानंतर त्याने आता वन डे सामन्यातही ही कामगिरी केली आहे. तो कसोटी सामना श्रीलंकेने जिंकला पण आज तो वन डेमध्ये आपल्या संघाला वाचवू शकला नाही.
एवढेच नाही तर मर्यादीत षटकांच्या लीस्ट-ए श्रेणीच्या क्रिकेटमध्ये त्याने ‘कॅरिंग दी बॅट’ करण्याची ही तिसरी वेळ आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज आहे. आजच्या न्यूझीलंडविरुध्दच्या कामगिरीआधी त्याने कँडी संघासाठी नुवारा एलिया (२०१७) आणि गॉल (२०१९) संघाविरुध्द ‘कॅरिंग दि बॅट थ्रू’ ची कामगिरी केलेली होती. आता तिसºयांदा ही कामगिरी करुन त्याने मुदस्सर नझर व ग्रँट फ़्लावर यांना मागे टाकले आहे.
वन डे क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणूनही ‘कॅरिंग दी बॅट थ्रू’ करणारा तो दुसराच खेळाडू आहे. पहिला खेळाडूसुद्धा श्रीलंकनच होता. त्यांच्या उपुल थरंगाने ऑक्टोबर २०१७ मध्ये पाकिस्तानविरुध्द अबुधाबीच्या सामन्यात नाबाद ११२ धावा करताना ‘कॅरिंग दी बॅट थ्रू’ ची कामगिरी केली होती.
Web Title: ICC World Cup 2019: The third time to be an unbeaten record
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.