लीड्स, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : शिखर धवनच्या दुखापतीमुळे रिषभ पंतला अखेरीस वर्ल्ड कप स्पर्धेतील भारतीय संघात स्थान मिळाले. निवड समितीनं पंतपेक्षा अनुभवी दिनेश कार्तिकचा संघ निवडताना विचार केला होता. पण, धवनला दुखापत झाली आणि रिषभला वर्ल्ड कपचा कॉल आला. शनिवारी अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात तो वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला सामना खेळण्याची शक्यता आहे. विजय शंकरच्या पायाला दुखापत झाल्यामुळे रिषभची खेळण्याची शक्यता वाढली आहे. पण, वर्ल्ड कप स्पर्धेत निवड झाल्याचे सांगितले तेव्हा आईनं तातडीनं मंदिर गाठले आणि देवाचे आभार मानले, असे रिषभने सांगितले.
रिषभ पंतने शुक्रवारी चहल टीव्हीवर पदार्पण केले. त्यावेळी त्याने गप्पा मारल्या. तो म्हणाला,''वर्ल्ड कप संघात निवड झाली नव्हती तेव्हा थोडासा निराश नक्की झालो होतो, परंतु त्या गोष्टीकडे मी सकारात्मक दृष्टीने पाहिले. संघात निवड न झाल्यास मी अधिक मेहनत घेतो. वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याचे प्रत्येक भारतीय खेळाडूचे स्वप्न असते.''
तो पुढे म्हणाला,''शिखर धवनला पर्यायी खेळाडू म्हणून मला कॉल आला त्यावेळी आई सोबतच होती आणि तिला मी हे सांगितले. ती लगेचच मंदिरात गेली, ती खूप आनंदात होती. लहानपणापासून एक तरी वर्ल्ड कप खेळायला मिळावा, असे स्वप्न होते. देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा मानस आहे. त्यामुळे कॉल येताच मला अत्यंत आनंद झाला.''