लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पंचांनी दुसरा धक्का न्यूझीलंडला दिला आहे. यापूर्वी पंच माराएस इरॅसमस यांनी रॉस टेलरच्या चुकीच्या पद्धतीने बाद ठरवले आहे. आता याच इरॅसमस यांनी दुसऱ्यांदा चुकीचा निर्णय दिला असून त्याचा फटका न्यूझीलंडला बसू शकतो.
नेमके घडले काय?
पहिल्या षटकामध्ये ही गोष्ट घडली. हे षटक न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट टाकत होता. बोल्टचा हा चेंडू इंग्लंडचा सलामीवीर जेसर रॉयच्या पायावर आदळला. यावेळी न्यूझीलंडच्या खेळाडूंनी जोरदार अपील केली. त्यावेळी इरॅसमस यांनी रॉयला नाबाद दिला. यावर न्यूझीलंडने रीव्ह्यू मागितला. रीव्ह्यूमध्ये चेंडू स्टम्पच्या रेषेमध्ये पडला होता. त्याचबरोबर चेंडू अर्धा स्टम्पला लागत होता. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी रॉयला नाबाद ठरवले, कारण पंचांनी त्याला आऊट दिले नव्हते. जर इरॅसमस यांनी रॉयला आऊट दिले असते आणि इंग्लंडने रीव्ह्यू घेतला असता तर तिसऱ्या पंचांनी रॉयला बाद ठरवले असते. त्यामुळे इरॅसमस यांचा हा दुसरा चुकीचा निर्णय न्यूझीलंडसाठी घातक ठरू शकतो.
अंतिम फेरीतही सदोष पंचगिरी; रॉस टेलरला ढापला
विश्वचषकातील पंचांची वाईट कामगिरी अंतिम फेरीतहीकायम राहिल्याचे पाहायला मिळाले. या गोष्टीचा मोठा फटका न्यूझीलंडच्या संघाला बसू शकतो. कारण पंच माराएस इरॅसमस यांनी न्यूझीलंडचा अनुभवी क्रिकेटपटू रॉस टेलरला चुकीच्या पद्धतीने बाद दिल्याचे आता पुढे आले आहे.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन बाद झाल्यावर संघाची मदार टेलरवर होती. टेलरने धावांची गती कायम राखत धावपलक हलता ठेवला होता. टेलर स्थिरस्थावर झालेला दिसत होता. टेलर आता मोठे फटके मारणार असे वाटत होते, पण त्याचवेळी पंचांच्या चुकीच्या निर्णयाने त्याचा घात केला.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूडने ३३व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर टेलरला पायचीत पकडले. यावेळी त्यांनी पंचांकडे जोरदार अपील केले. त्यावेळी पंच इरॅसमस यांनी टेलरला बाद ठरवले. न्यूझीलंडकडे रीव्ह्रू नसल्याने टेलरला या निर्णयाविरोधात दाद मागता आली नाही. त्यामुळे मान खाली घालून टेलर माघारी परतला.
टेलर माघारी परतल्यानंतर हा चेंडू पुन्हा दाखवण्यात आला. त्यावेळी वूडचा चेंडू स्टम्पला लागत नसल्याचे स्पष्टपण दिसत होते. हा चेंडू स्टम्पच्या वरून जात असल्यामुळे तो पायचीत बाद देणे, चुकीचे असल्याचे साऱ्यांनी पाहिले. अंतिम फेरीत जर पंचांकडून अशा चुका होत असतील तर खेळाडूंनी पाहायचे कुणाकडे, हा प्रश्न आता चाहते विचारू लागले आहेत.
Web Title: ICC World Cup 2019: umpire given wrong decision second time in match, which hurts New Zealand
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.