Join us  

ICC World Cup 2019 : रिषभ पंतला अफगाणिस्तानविरुद्ध मिळणार नाही संधी, जाणून घ्या कारण!

ICC World Cup 2019 : शिखर धवनला दुखापतीतून सावरणे अवघड झाल्यानंतर भारतीय संघात रिषभ पंतचा समावेश निश्चित करण्यात आला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 8:08 PM

Open in App

लीड्स, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : शिखर धवनला दुखापतीतून सावरणे अवघड झाल्यानंतर भारतीय संघात रिषभ पंतचा समावेश निश्चित करण्यात आला. वर्ल्ड कप संघ जाहीर करताना रिषभकडे निवड समितीनं दुर्लक्ष केलं होतं, परंतु नशिबानं त्याला वर्ल्ड कप संघात स्थान मिळवून दिले. त्यात सराव सत्रात विजय शंकरला झालेल्या दुखापतीमुळे वर्ल्ड कपमध्ये पदार्पणाचा सामना खेळण्याच्या पंतच्या आशा बळावल्या होत्या. शनिवारी अफगाणिस्तानविरुद्ध तो पदार्पण करेल, असे संकेतही दिले जात होते. मात्र, त्याला अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळणार नसल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. विजय शंकर पूर्णपणे तंदुरूस्त झाला असून त्यालाच अंतिम अकरामध्ये संधी मिळणार असल्याचे संकेत आहेत.

पाकिस्तानविरुद्धच्या लढतीतून शंकरने वर्ल्ड कप स्पर्धेत पदार्पण केले. त्याने त्या सामन्यात दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या आणि 15 धावांचे योगदानही दिले. धवनच्या अनुपस्थितील लोकेश राहुलला सलामीला संधी मिळाली आणि शंकरची संघात एन्ट्री झाली. पण, अफगाणिस्ताचा सामना करण्यापूर्वी सराव सत्रात जसप्रीत बुमराहच्या यॉर्करवर शंकरच्या पायाला दुखापत झाली आणि भारताला आणखी एक धक्का बसणार की काय, असे वाटू लागले. पण, शंकरची दुखापत गंभीर नसून तो कमबॅक करेल असा विश्वास बुमराहने व्यक्त केला होता.शुक्रवारी शंकरने पत्रकार परिषदेत हजेरी लावत दुखापतीतून सावरला असल्याचे सांगितले. तो म्हणाला,''दुखापतीतून पूर्णपणे बरा झालो आहे. उद्याच्या सामन्यात खेळेन अशी आशा आहे.'' 

शंकरच्या या वक्तव्याने पंतचे वर्ल्ड कप स्पर्धेतील पदार्पण लांबणीवर टाकले आहे. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्ध त्याच्या खेळण्याच्या आशाही संपुष्टात आल्या आहेत. 

दरम्यान, भारत-अफगाणिस्तान लढतीत विजय शंकर आणि रशीद खान हे सनरायझर्स हैदराबाद संघाचे सहकारी समोरासमोर येणार आहेत. रशीदसोबत शंकरने सरावही केला आहे आणि त्याचा फायदा वर्ल्ड कपच्या या सामन्यात होईल, असा त्याला विश्वास आहे. तो म्हणाला,'' मर्यादित षटकांच्या सामन्यांत रशीद हा सर्वोत्तम गोलंदाज आहे. सनरायझर्स हैदराबाद संघात त्याच्यासोबत खेळताना त्याच्याकडून बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळाल्या. त्याच्या गोलंदाजीची विविधता मी समजून घेण्याचा प्रयत्न सराव सत्रात केला होता.'' 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019भारतरिषभ पंतअफगाणिस्तान