ओव्हल, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत सध्या 'बेल्स'चं वजन वाढताना दिसत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात डेव्हिड वॉर्नरच्या बॅटीला लागून चेंडू यष्टिंवर आदळला, परंतु बेल्स न पडल्याने त्याला जीवदान मिळालं. यंदाच्या स्पर्धेत हे असं पाचव्यांदा घडत आहे आणि त्यामुळे खेळाडूंमध्ये नाराजी पसरली आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंच यांनी या प्रकरणाची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे तक्रार केली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या डावात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर वॉर्नरने बचावात्मक फटका मारला, परंतु तो चेंडू यष्टिंवर आदळला तरीही बेल्स न हलल्यानं सर्वांना आश्चर्य व्यक्त केले. कोहली म्हणाला,''आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे प्रकार अपेक्षित नाही. तत्रज्ञानाच्या दृष्टीनं ते योग्य आहे, परंतु त्याचं वजन थोडं कमी करायला हवं. चेंडू स्टम्पवर आदळूनही एखाद्या गोलंदाजाला विकेट न मिळणे, हे संतापजनक आहे. जसप्रीत बुमराह हा मध्यमगती गोलंदाज नाही तो जलदगती गोलंदाज आहे. तरीही बेल्स पडल्या नाही, याचं आश्चर्य वाटतं.''
''असं का झालं मला माहीत नाही आणि महेंद्रसिंग धोनीनंही बेल्स तपासून पाहिल्या. स्टम्प्सचे एवढे वजन नाही, परंतु नेमकं काय चुकतंय याचा विचार व्हायला हवा,'' असे कोहली म्हणाला.
ऑसी कर्णधार फिंचनेही नाराजी प्रकट केली. तो म्हणाला,''वॉर्नरच्या वेळी चेंडू यष्टिंवर जोरातच आदळला होता. गोलंदाजाचे दुर्दैव म्हणावं लागेल. पण, असं वारंवार घडायला नको. असं जर उपांत्य किंवा अंतिम फेरीत घडू नये यासाठी पाऊलं उचलायला हवीत.''
भारतानं ऑस्ट्रेलियाचा विजयरथ अडवलावर्ल्ड कप स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोत्तम कामगिरीची नोंद करणाऱ्या भारतीय संघाने रविवारी विजय मिळवला. नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूनं लागल्यानं विराट कोहलीची बाजू वरचढ ठरली. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 352 धावांचा डोंगर उभा केला. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी हळुहळू का होईना हा डोंगर सर करण्याच्या दृष्टीनं पाऊल टाकले होते, परंतु भारतीय गोलंदाजांनी कामगिरीचा आलेख उंचावत त्यांना रोखले. भारताने 36 धावांनी हा सामना जिंकला आणि ऑस्ट्रेलियाची सलग दहा सामन्यांतील अपराजीत मालिका खंडित झाली. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 316 धावांत तंबूत परतला.