साउदम्टन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघ वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला सामना बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. आफ्रिकेला वर्ल्ड कप स्पर्धेत दोन पराभवांचा सामना करावा लागला असला तरी त्यांना हलक्यात लेखण्याची चूक भारतीय संघ करणार नाही. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ जेतेपदाच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. त्यासाठी भारतीय खेळाडू कसून सरावाला लागले आहेत. साउदम्टन येथील दी रोज बाऊल स्टेडियमवर हा सामना होणार आहे. या सामन्यात कोहलीला दोन विक्रम नोंदवण्याची संधी आहे.
कोहलीची प्रत्येक खेळी हा एक वेगळा विक्रमच असतो... यामुळेच आतापर्यंत त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेतही त्याच्याकडून अशाच विक्रमी खेळींची अपेक्षा आहे. भारतीय संघाने पहिल्याच सामन्यात आफ्रिकेला नमवल्यास कर्णधार म्हणून कोहली विजयाचे अर्धशतक पूर्ण करेल. त्याच्या नावावर आतापर्यंत 49 विजय आहेत.
याशिवाय कोहलीला आणखी एक मोठा विक्रम करण्याची संधी आहे. आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याला वन डे क्रिकेटमधील 11 हजार धावा करण्याची संधी आहे. त्यासाठी त्याला 157 धावा कराव्या लागतील. असे केल्यास सचिन तेंडुलकर ( 18426) आणि सौरव गांगुली ( 11221) यांच्यानंतर 11 हजार धावा करणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरेल. कोहलीनं 227 वन डे सामन्यांत 59.57च्या सरासरीनं 10843 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 41 शतकं आणि 49 अर्धशतकांची नोंद आहे.
'या' स्टेडियमवर भारत खेळणार पहिला सामना, यापूर्वी कशी झालीय कामगिरी?भारताचा पहिला सामना साउदम्टन येथील दी रोज बाऊल स्टेडियमवर होणार आहे. या स्टेडियमवर वर्ल्ड कप स्पर्धेचे पाच सामने खेळवण्यात येणार आहेत आणि ज्यात भारताच्या दोन सामन्यांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेसह भारतीय संघ 22 जूनला अफगाणिस्तानचा याच मैदानावर सामना करणार आहे. 2001 साली हे स्टेडियम तयार करण्यात आले. कौंटी क्रिकेटमधील हॅम्पशायर क्लबचे हे घरचे मैदान आहे आणि त्याची क्षमता 15000 प्रेक्षकांची आहे. या मैदानावर प्रथमच वर्ल्ड कप सामना खेळवण्यात येणार आहे. या मैदानावर भारतीय संघ तीन वन डे सामना खेळला आहे आणि त्यात त्यांना एकच विजय मिळवता आलेला आहे. 11सप्टेंबर 2004 मध्ये भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत केनियावर विजय मिळवला होता. त्यानंतर 2007 आणि 2011मध्ये झालेल्या सामन्यांत त्यांना इंग्लंडकडून हार पत्करावी लागली आहे