लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ पहिला सामना बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताची गोलंदाजी सर्वात भेदक असल्याचे म्हटले जात आहे. पण तरीदेखील कर्णधार विराट कोहली नेट्समध्ये बॉलिंगची प्रॅक्टीस करताना पाहायला मिळाला आणि सर्वांनाच धक्का बसला. पण, डिसेंबर 2017नंतर कोहलीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी केलेली नाही आणि यामागचा खुलासा कोहलीनं केला.
फलंदाजीत अनेक विक्रमांना गवसणी घालणाऱ्या कोहलीच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आठपेक्षा अधिक विकेट नक्की जमा झाल्या असत्या. पण, सहकारी खेळाडूंचा त्याच्या गोलंदाजीवर भरवसा नव्हता आणि म्हणून त्याने डिसेंबर 2017नंतर गोलंदाजी करणे सोडले.
तो म्हणाला,'' 2017साली श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेत आम्ही जवळपास सर्वच सामने जिंकत होतो. त्यामुळे मी महेंद्रसिंग धोनीकडे गोलंदाजी करू का अशी विचारणा केली. धोनी मला गोलंदाजी द्यायला तयारच होता, परंतु त्याचवेळी सीमारेषेवर उभ्या असलेल्या जसप्रीत बुमराहने टोकले. तो म्हणाला, हा आंतरराष्ट्रीय सामना आहे, कोणताही मस्करीचा विषय नाही. मला माझ्या गोलंदाजीवर जेवढा विश्वास होता, तेवढा माझ्या सहकाऱ्यांना नव्हता. त्यानंतर माझे पाठीचे दुखणे वाढले आणि मी गोलंदाजी केली नाही.''
कोहलीनं वन डे आणि ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रत्येकी चार विकेट घेतल्या आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 163 चेंडू टाकले, पंरतु त्याला विकेट घेता आली नाही. कोहली म्हणाला,''दिल्लीच्या अकादमीत असताना मी जेम्स अँडरसनची नकल करून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करायचो. अँडरसनसोबत खेळण्याची संधी मिळाली तेव्हा हे त्याला मी सांगितले. त्यानंतर दोघेही खूप हसलो.''
Web Title: ICC World Cup 2019: Virat Kohli did not bowl after december 2017, know why?
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.