साउदॅम्टन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला सराव सत्रात झालेल्या दुखापतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीसाठी भारतीय संघ कसून सराव करत आहे आणि याच सरावादरम्यान कोहलीच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. पण, त्याची ही दुखापत गंभीर नसून तो पहिल्या सामन्यात खेळणार असल्याची माहिती, बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली.
वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होऊन तीन दिवस झाले तरीही भारतात क्रिकेटमय वातावरण अजून हवं तसं निर्माण झालेलं नाही. जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांत आघाडीवर असलेल्या भारतीय संघाचा पहिला सामना येत्या बुधवारी होणार आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सामना करणार आहे. या सामन्यात भारतच बाजी मारेल असा सर्वांना विश्वास आहे,परंतु त्याला तडा जाण्याची शक्यता निर्माण झाली होती.
कर्णधार कोहलीनं सराव सत्रात अंगठ्याला दुखापत करून घेतली आहे आणि त्याची ही दुखापत तीन दिवसात बरी न झाल्यास त्याला पहिल्या सामन्याला मुकावे लागेल. पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघ साउदॅम्पटन येथे दाखल झाला आणि खेळाडूंनी सरावाचा श्री गणेश: केला. पण शनिवारी सराव सत्रात कोहलीच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्याने सराव सत्रातूनही माघार घेतली आणि पुन्हा तो परतला नाही. संघाचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांनी कोहलीला प्रार्थमिक उपचार दिले.
अंगठ्याबर थंड पाण्याची पिशवी ठेवून कोहली ड्रेसिंग रुममध्ये परतला. भारतीय संघाची जबाबदारी पूर्णत: कोहलीच्या खांद्यावर आहे आणि त्याची दुखापत गंभीर असल्यास भारताला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण, घाबराचये कारण नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले. भारतीय संघ रविवारी सरावापासून विश्रांती घेणार असल्याचेही बीसीसीआयने स्पष्ट केले.