मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : महेंद्रसिंग धोनीसारखा अनुभवी खेळाडूला भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात सातव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले. भारताचे आघाडीचे तीनही फलंदाज अवघ्या 5 धावांवर तंबूत परतले होते आणि अशा परिस्थिती खेळपट्टीवर टिकून खेळणारा फलंदाज मैदानावर असणे आवश्यक होते. पण, तसे झाले नाही आणि न्यूझीलंडने 18 धावांनी विजय मिळवला. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत धोनीला सातव्या क्रमांकावर का पाठवलं, यामागचं लॉजिक कर्णधार विराट कोहलीनं सांगितलं.
Video : विराट कोहली अन् रवी शास्त्री यांच्यात तू तू मै मै; पंत बाद होताच कॅप्टन भडकला, पण का?
भारताचे चार फलंदाज अवघ्या 24 धावांवर माघारी परतले होते. पहिला पॉवरप्ले संपल्यानंतर हार्दिक पांड्या मैदानावर आल्यानं सर्वांना आश्चर्य वाटले. पांड्यानं 62 चेंडूंत 32 धावा केल्या, पण चुकीचा फटका मारून तो माघारी परतला. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं धोनीला न पाठवण्याच्या निर्णयावर नाराजी प्रकट केली. गांगुली यावेळी म्हणाला की, " धोनीला चौथ्या क्रमांकावरच फलंदाजीला पाठवायला हवे होते. कारण तुम्ही 2011चा वर्ल्ड कप पाहिला असेल. 2011च्या वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीतही भारताची अशीच अवस्था होती. त्यावेळी धोनी कर्णधार होता. धोनी स्वत: त्यावेळी चौथ्या क्रमांकावर आला होता. चौथ्या क्रमांकावर येऊन धोनीने संघाच्या विजयावर षटकार मारत शिक्कामोर्तब केले होते. त्यामुळे या सामन्यातही धोनीला चौथ्या क्रमांकावर पाठवायला हवे होते."
पांड्या बाद झाल्यानंतर धोनी मैदानावर आला आणि त्यानं रवींद्र जडेजाच्या सोबतीनं 116 धावांची भागीदारी केली. षटकाला 8 धावा या सरासरीनं धावांची गरज असताना या जोडीनं चेंडू व धावांच अंतर 13 व 31 असं कमी केलं. ट्रेंट बोल्टनं जडेजाला बाद केलं आणि त्यानंतर धोनी धावबाद झाला. धोनीला सातव्या क्रमांकावर का पाठवले, या प्रश्नावर कोहली म्हणाला,''वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यांत धोनीवर आम्ही जबाबदारी सोपवली होती. ती म्हणजे कठीण प्रसंगी मैदानावर उतरून परिस्थिती अवाक्यात आणायची, एका बाजूनं खेळपट्टीवर टिकून राहायचे आणि अखेरच्या 6-7 षटकांत फटकेबाजी करायची, ही ती जबाबदारी होती.''