लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात 240 धावांचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ 221 धावांत तंबूत परतला. रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंग धोनी यांची 116 धावांची भागीदारी व्यर्थ ठरली. या सामन्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला ( आयसीसी) एक पर्याय सुचवला आहे. भविष्यात आयपीएल स्पर्धेची बाद फेरी ही इंडियन प्रीमिअर लीगच्या प्ले-ऑफ फॉरमॅटमध्ये खेळवण्यात यावा, असा पर्याय कोहलीनं सुचवला आहे. आयपीएलच्या प्ले ऑफनुसार गुणतालिकेत अव्वल असलेल्या संघाला अतिरिक्त संधी मिळते आणि भविष्यातील वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये याचा विचार व्हावा, असा कोहलीचा मुद्दा आहे.
तो म्हणाला,''भविष्य कोणाला माहित आहे. गुणतालिकेत अव्वल असणे हेच महत्त्वाचे असू शकते. वर्ल्ड कप स्पर्धेचे महत्त्व लक्षात घेता, या पर्यायाचा विचार व्हायला काहीच हरकत नाही. हाच फॉरमॅट योग्य ठरू शकतो. पण, आता त्याची अंमलबजावणी कधी होईल, हे मलाही माहित नाही.''
साखळी फेरीत भारतीय संघाने 7 विजय आणि 1 अनिर्णीत निकालासह गुणतालिकेत 15 गुणांची कमाई करताना अव्वल स्थान पटकावले होते. पण, उपांत्य फेरीत त्यांना चौथ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडकडून हार मानावी लागली. वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीच्या सामन्यांऐवजी प्ले ऑफ फॉरमॅट झाला असता तर भारताला अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा आणखी एक संधी मिळाली असती.
प्ले- ऑफच गणित काय?प्ले-ऑफ फॉरमॅटनुसार गुणतालिकेत दोन अव्वल संघ क्वालिफायर 1मध्ये भिडतात. या सामन्यातील विजेता थेट अंतिम फेरीत प्रवेश करतो, तर पराभूत संघाला आणखी एक संधी मिळते. क्वालिफायर 2 मध्ये तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर असलेले संघ खेळतात. त्यांच्यातील विजेता हा क्वालिफायर 1 मधील पराभूत संघासोबत खेळतो. या सामन्यातील विजेता अंतिम फेरीत प्रवेश करतो. 2011च्या आयपीएल स्पर्धेत प्रथम हा फॉरमॅट वापरण्यात आला.