लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं सोमवारी जाहीर केलेल्या वर्ल्ड कप संघात जगातील सर्वोत्तम फलंदाज विराट कोहलीला स्थान न मिळाल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. आयसीसीने जाहीर केलेल्या संघात फक्त दोन भारतीय खेळाडूंचा सामावेश करण्यात आला आहे. या संघात भारताच्या रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमरा यांना स्थान देण्यात आले आहे. भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर यानंही अंतिम सामन्या दरम्यान वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम 11 खेळाडूंची निवड करून एक संघ जाहीर केला होता. त्यात विराटने स्थान पटकावलेय खरे, परंतु कर्णधारपदाची जबाबदारी त्याच्याकडे न सोपवण्याचा निर्णय तेंडुलकरने घेतला.
आयसीसीच्या संघात न्यूझीलंड आणि इंग्लंडच्या खेळाडूंची संख्या जास्त आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन, लुकी फर्ग्युसन यांचा समावेश करण्यात आला आहे, तर ट्रेंट बोल्टला बारावा खेळाडू ठेवला आहे. इंग्लंडच्या जेसन रॉय, जो रूट, बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क आणि अॅलेक्स केरी यांना संघात स्थान दिले आहे. या वर्ल्ड कपमध्ये दमदार अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या बांगलादेशच्या शकिब अल हसन याचाही या संघात समावेश करण्यात आला आहे.
तेंडुलकरने जाहीर केलेल्या संघात भारतीय खेळाडूंचा भरणा आहे. तेंडुलकरच्या संघात सलामीवीर म्हणून रोहित शर्मा व जॉनी बेअरस्टो यांची निवड करण्यात आली आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन आणि कोहली यांच्याकडे मधल्या फळीची जबाबदारी असेल, तर बांगलादेशचा शकिब अल हसन, इंग्लंडचा बेन स्टोक्स आणि भारताचा हार्दिक पांड्या व रवींद्र जडेजा हे चार अष्टपैलू खेळाडू या संघात आहेत. ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क, इंग्लंडचा जोफ्रा आर्चर आणि भारताचा जसप्रीत बुमराह यांच्यावर जलद माऱ्याची जबाबदारी असेल.
या संघाचे नेतृत्व तेंडुलकरने वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावणाऱ्या विलियम्सनकडे सोपवले आहे.