नॉटिंगहॅम, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. दोन्ही संघांना समान एका गुणावर समाधान मानावे लागले. या सामन्यावर पाणी फिरल्यानंतर भारतीय चाहत्यांचे लक्ष लागलेय ते भारत-पाकिस्तान या महामुकाबल्याकडे. या सामन्यात भारतीय खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करणार असल्याचा निर्धार कर्णधार विराट कोहलीनं बोलून दाखवला.
भारत आणि न्यूझीलंड सामन्यात एकही चेंडू टाकण्यात आला नाही. पावसानं सातत्य राखत गुरूवारी बाजी मारली. या सामन्यानंतर कोहली म्हणाला,''पाकिस्तान हा आमचा परंपरागत कट्टर प्रतिस्पर्धी राहिला आहे. जगभरातील चाहत्यांनाही या सामन्याची उत्सुकता लपवता येत नाही. या अशा महत्त्वाच्या सामन्याचा सदस्य असल्याचा मला अभिमान वाटतो. या सामन्यात आम्ही आमच्यातील सर्वोत्तम कामगिरी करून दाखवू. मानसिक कणखरता महत्त्वाची आहे. मैदानावर उतरून आम्हाला केवळ रणनीतीची अंमलबजावणी करायची आहे.''
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत झालेल्या दुखापतीमुळे तीन आठवडे क्रिकेटपासून दूरावलेला शिखर धवन वर्ल्ड कप स्पर्धेत कमबॅक करण्यासाठी सज्ज होत आहे. पॅट कमिन्सने टाकलेल्या चेंडूवर भारताच्या सलामीवीराच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. तरीही त्यानं जिद्दीनं खेळ करत 117 धावा चोपून काढल्या होत्या. मात्र, दुखापतीमुळे तो क्षेत्ररक्षणाला आला नाही. तो दुखापतीतून सावरत असून 10-12 दिवसांत तो कमबॅक करेल असा विश्वास आहे.
नॉटिंगहॅम येथील ट्रेंट ब्रिज मैदानावर तो संघांसोबत सराव सत्रातही दिसला होता. भारत-न्यूझीलंड हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आणि दोन्ही संघांना समाना एक गुण देण्यात आले. या सामन्यानंतर कॅप्टन विराट कोहलीनं धवनच्या दुखापतीबाबत महत्त्वाची अपडेट दिली.''त्याच्या अंगठ्याला प्लास्टर करण्यात आले आहे आणि पुढीत काही दिवस ते तसेच ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्याच्या दुखापतीची चिकिस्ता करण्यात येईल. आशा करतो की तो साखळी फेरीच्या मध्यंतराच्या सत्रात पुनरागमन करेल आणि उपांत्य फेरीचा सामनाही खेळेल.''
ESPNcricinfoच्या हाती लागलेल्या माहितीनुसार साखळी फेरीच्या अखेरच्या टप्प्यात धवन पुनरागमन करेल. त्यामुळे तो यजमान इंग्लंडविरुद्ध 30 जूनला एडबॅस्टन येथे होणाऱ्या लढतीत खेळण्याची शक्यता आहे.