ट्रेंट ब्रिज, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड कप स्पर्धेत आज होणाऱ्या लढतीवर पावसाचे सावट आहे. जर हा सामना झालाच, तर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याची संधी आहे. कोहलीची प्रत्येक खेळी ही कोणता ना कोणता तरी विक्रम मोडणारी ठरते, त्यात त्याच्या विक्रमाची तुलना तेंडुलकरशी केली जाते. त्यामुळे किवींविरुद्ध 57 धावा केल्यास कोहली तेंडुलकरच्या आणखी एका विक्रमाला गवसणी घालणार आहे.
कोहलीला वन डे क्रिकेटमध्ये 11000 धावा पूर्ण करण्यासाठी 57 धावांची आवश्यकता आहे. कोहलीच्या नावावर सध्या 221 डावांत 10943 धावा आहेत आणि वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10000 धावा करण्याचा विक्रम त्याचा नावावर आहे. जर न्यूझीलंडविरुद्ध त्यानं 57 धावा केल्यास तर 11 वर्षांहून कमी कालावधीत हा पल्ला गाठणारा कोहली हा पहिलाच फलंदाज ठरेल. वन डे क्रिकेटमध्ये 11000 धावा करणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरणार आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनी हा पल्ला पार केला आहे.
याशिवाय कोहलीला न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक शतक करणाऱ्या वीरेंद्र सेहवाग व रिकी पाँटिंग यांच्या विक्रमाशी बरोबरी करण्याचीही संधी आहे. शिवाय न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांत दुसऱ्या स्थानी झेप घेण्याचा विक्रमही त्याला खुणावत आहे. सेहवागनं किवींविरुद्ध 23 डावांत 1157 धावा केल्या आहेत, तर तेंडुलकरच्या नावावर 1750 धावा आहेत. कोहलीनं 19 डावांत 1154 धावा केल्या आहेत.
केदार जाधवचे वरुण राजाला साकडे, महाराष्ट्रात पाऊस पडण्यासाठी गाऱ्हाणंयंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना न गमावलेले दोन बलाढ्य संघ आज एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. न्यूझीलंड संघ तीन विजयांसह अव्वल स्थानावर आहे, तर भारतानं दोन सामने जिंकून टॉप फोरमध्ये मुसंडी मारली आहे. त्यामुळे आजच्या सामन्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. पण, क्रिकेट चाहत्यांच्या या उत्सुकतेवर आज पाणी फिरण्याची शक्यता आहे. येथील स्थानिक हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजचा खेळ पावसामुळे वाया जाण्याची शक्यता आहे. भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू केदार जाधवनं पावसाकडे गाऱ्हाणं गायलं आहे. त्यानं नॉटिंगहॅम येथे नाही, तर महाराष्ट्रात तुझी गरज असल्याची विनंती वरुण राजाला केली आहे.