लीड्स, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघ शनिवारी अफगाणिस्तानचा सामना करणार आहे. या सामन्यात भारताचेच पारडे जड आहे. अफगाणिस्तानला आतापर्यंत पाचही सामन्यांत पराभव पत्करावा लागलेला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून फार काही चमत्कारीक घडण्याची अपेक्षा नाही. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीला आणखी एक विश्वविक्रम नोंदवण्याची संधी आहे. या सामन्यातून त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगानं 20 हजार धावांचा विक्रम नावावर करण्याची संधी आहे आणि त्यासाठी त्याला अफगाणिस्तानविरुद्ध 104 धावांची खेळी करावी लागेल.
पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत कोहलीनं वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 11 हजार धावा करण्याचा विक्रम नावावर केला होता. आता त्याला सर्वात जलद 20 हजार आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम नावावर करून सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा या महान फलंदाजांना मागे टाकण्याची संधी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार धावा करणारा कोहली जगातील बारावा, तर तेंडुलकर ( 34357) आणि राहुल द्रविड ( 24208) यांच्यानंतर तिसरा भारतीय फलंदाज ठरणार आहे. कोहलीच्या नावावर वन डेत 11020, कसोटीत 6613 आणि ट्वेंटी-20 2263 धावा आहेत.
तेंडुलकर आणि लारा यांनी सर्वात कमी म्हणजे 453 डावांत 20 हजार आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. कोहलीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 415 डाव ( 131 कसोटी, 222 वन डे आणि 62 ट्वेंटी-20) फलंदाजी केली आहे. त्यात त्याच्या नावावर 19896 धावा आहेत. तेंडुलकर आणि लारा यांच्यानंतर या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर रिकी पाँटिंगचा ( 468) नंबर येतो.
तत्पूर्वी, विराटने वन डे क्रिकेटमध्ये 11 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. विराटने केवळ 222 डावांत 11 हजार धावा पूर्ण केल्या. त्याबरोबरच तो सर्वात वेगाने 11 हजार धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला आहे. विराट हा सर्वात कमी म्हणजे 222 डावांत 11 हजार धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाज ठरला. यापूर्वी हा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. त्याने 276 डावांत 11 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. त्याबरोबरच 11 वर्षांहून कमी कालावधीत हा पल्ला गाठणारा कोहली हा पहिलाच फलंदाज ठरला आहे. वन डे क्रिकेटमध्ये 11000 धावा करणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनी हा पल्ला पार केला आहे.