लंडन - विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत अनपेक्षितरीत्या पराभूत झाल्यापासून कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्री यांच्यावर जोरदार टीका होत आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेली प्रशासकांची समिती विराट कोहली आणि रवी शास्त्री भारतात परतल्यावनंतर स्पर्धेतील भारतीय संघाच्या कामगिरीचे परीक्षण करणार आहे. विनोद राय यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांच्याशीसुद्धा चर्चा करणार आहे. महत्त्वाच्या स्पर्धेसाठीची संघनिवड हा या समीक्षेचा मुख्य उद्देश राहणार आहे. याबाबत विनोद राय यांनी सांगितले की, कर्णधार आणि प्रशिक्षक माघारी परतल्यानंतर निश्चितपणे बैठक होणार आहे. मी तारीख आणि वेळ सांगू शकत नाही, पण आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तसेच आम्ही निवड समितीशीही चर्चा करणार आहोत.'' मात्र यासंदर्भात अधिक माहिती देण्यास विनोद राय यांनी नकार दिला. दरम्यान, भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यानंतरही मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि साहाय्यक स्टाफच्या करारात 45 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. पण, साहाय्यक प्रशिक्षक आणि फलंदाज प्रशिक्षक संजय बांगर यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार ठेवण्यात आली आहे. बांगर यांना अधिक चांगला रिझल्ट देता आला असता असे मत भारतीय क्रिकेट मंडळानं ( बीसीसीआय) व्यक्त केले. गोलंदाज प्रशिक्षक भरत अरुण यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करून दाखवली, तर क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर श्रीधर यांनीही त्यांची भूमिका चोख पार पाडली. पण, बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली फलंदाजांची कामगिरी चांगली झालेली नाही. बांगर यांना चौथ्या क्रमांकाचा पर्याय शोधताच आला नाही आणि त्यामुळेच भारताचे आव्हान संपुष्टात आले. IANS सोबत बोलताना बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितले की,''फलंदाजांची चुकलेली निवड यामुळे आम्हाला फटका बसला. बांगर यांना योग्य पर्याय निवडता आला नाही. खेळाडूंना आम्ही सर्वतोपरी सहकार्य केले आणि त्यांनीही चांगली कामगिरी केली. न्यूझीलंडविरुद्धचा उपांत्य फेरीचा सामना वगळता.'' विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य लढतीत भारताला न्यूझीलंडकडून 18 धावांनी पराभूत व्हावे लागले होते.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- ICC World Cup 2019 : पराभव कसा झाला? विराट, शास्त्रीवर होणार प्रश्नांची सरबत्ती
ICC World Cup 2019 : पराभव कसा झाला? विराट, शास्त्रीवर होणार प्रश्नांची सरबत्ती
विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत अनपेक्षितरीत्या पराभूत झाल्यापासून कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्री यांच्यावर जोरदार टीका होत आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 9:37 PM