लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019भारत वि. पाकिस्तान : वर्ल्ड कप स्पर्धेतील ज्या सामन्याची आतुरतेनं वाट पाहिली जात होती तो भारत-पाकिस्तान सामना अवघ्या एका दिवसानंतर होणार आहे. भारत-पाकिस्तान म्हटलं की ठसन आलीच... ती मैदानावरही असते आणि मैदानाबाहेरही. पण, हा सामना सुरू होण्यापूर्वीच दोन्ही देशांच्या खेळाडूंमध्ये जोरदार संघर्ष झालेला पाहायला मिळत आहेत. पाकिस्तानच्या शोएब अख्तरनं या सामन्यासाठी भारतीय संघाच्या सांगण्यानुसार खेळपट्टी तयार करण्यात आल्याचा आरोप केला. त्यावर भारताच्या वीरेंद्र सेहवागनं दिलेलं उत्तर ऐकून अख्तरची बोलतीच बंद झाली. जाणून घेऊया नक्की काय घडलं?
भारताने या वर्ल्ड कप स्पर्धेत त्यांना हवी तशी खेळपट्टी बनवून घेतली आहे, असे मत अनेक क्रिकेटपटूंनी व्यक्त केलं आहे. हे असं कसं असू शकतं. ही गोष्ट खरी आहे का?, अख्तरच्या या प्रश्नावर सेहवाग खवळला. तो म्हणाला,''हे तथ्य असल्याचं तुलाही वाटतं. लोकांचं कामच ते आहे. मी एवढचं म्हणेन, हत्ती डौलानं चालत असताना कुत्रे भुंकत असतात. खेळपट्टी कशी असावी, हे आमच्या हातात असतं तर त्यावर जराही गवत दिसलं नसतं.''