लाहोर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघाच्या खिलाडूवृत्तीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटू वकार यूनुसनं आणखी एक दावा केला आहे. सर्फराज अहमदच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तान संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केल्यास, ते भल्याभल्यांना महागात पडू शकते, असा दावा त्याने केला आहे.
निराशाजनक सुरुवातीनंतर पाकिस्तानने सलग तीन सामने जिंकून उपांत्य फेरीच्या शर्यतीत स्वत:ला कायम राखले आहे. भारतानेइंग्लंडला पराभूत केले असते तर त्यांचा मार्गही मोकळा झाला असता. पण, तसे झाले नाही आणि पाक संघाला प्रतीक्षा करावी लागणार आहे. साखळी फेरीतील अखेरच्या लढतीत त्यांना बांगलादेशवर मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागाणार आहे. त्याचवेळी इंग्लंडच्या न्यूझीलंडकडून पराभवाची प्रार्थना करावी लागेल.
करो वा मरो अशा लढतील इंग्लंडने रविवारी बलाढ्य भारतावर 31 धावांनी विजय मिळवला. जेसन रॉय व जॉनी बेअरस्टो यांनी उभ्या केलेया मजबूत पायावर जो रूट व बेन स्टोक्स यांनी धावांची इमारत उभी केली. इंग्लंडच्या 337 धावांचा पाठलाग करताना भारताला 306 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे पाकिस्तानचा उपांत्य फेरीचा प्रवेश लांबणीवर पडला.
"एका क्षणाला आमचे आव्हान संपुष्टात असे वाटले होते. इतिहासाची पुनरावृत्ती होते की काय? मला कल्पना नाही, परंतु पाकिस्तानने उपांत्य फेरीत प्रवेश केला, तर ते भल्याभल्यांना भारी पडतील. पण त्यासाठी निकाल आमच्या बाजूने लागायला हवा. शिवाय बांगलादेशवर दणदणीत विजय मिळवायला हवा," असे वकार म्हणाला.