डेव्हीड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ ही जोडी म्हणजे ऑस्ट्रेलियन संघाचे भक्कम आधारस्तंभ. क्रिकेटमधील त्यांचं कौशल्य वादातीतच. वॉर्नरची फटकेबाजी आणि स्मिथची तंत्रशुद्धता केवळ लाजवाब. जगभरातील क्रिकेटप्रेमी त्यांच्या या गुणांचे चाहते आहेत. पण, त्यांच्या कारकिर्दीला लागलेला 'बॉल टॅम्परिंग'चा काळा डाग कायमचा मिटणं कठीणच असल्याचं चित्र वर्ल्ड कप स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या सामन्यात पाहायला मिळालं. हा सामना पाहायला आलेल्या दोन क्रिकेटप्रेमींना स्मिथ-वॉर्नरला डिवचण्यासाठी असा पेहेराव केला होता की, आधी स्टेडियमभर त्याची चर्चा झाली आणि इंटरनेटवर हे फोटो व्हायरल होत आहेत.
गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेतील मालिकेदरम्यान चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हीड वॉर्नर यांच्यावर एक वर्षाच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती. जलद गोलंदाज कॅमरून बॅनक्रॉफ्टकरवी त्यांनी बॉल टॅम्परिंगचं नियमबाह्य कृत्य केलं होतं. चेंडूची शाईन घालवण्यासाठी सँडपेपर वापरण्यात आला होता. त्यामुळेच, वॉर्नर-स्मिथची 'शाईन' घालवण्यासाठी ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यावेळी दोन क्रिकेटप्रेमी चक्क सँडपेपरचं कव्हर परिधान करून आले होते. त्यांच्याकडे कार्डबोर्डचा क्रिकेट बॉलही होता आणि मधे-मधे ते बॉल सँडपेपरवर घासत होते. ही जोडी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत होती.
वास्तविक, ऑस्ट्रेलियन संघाचा प्रशिक्षक जस्टीन लँगर, वॉर्नर आणि स्मिथच्या बचावासाठी पुढे सरसावला होता. या दोघांना त्यांनी केलेल्या चुकीची शिक्षा मिळाली आहे, त्यामुळे त्यांची खिल्ली उडवू नये, असं आवाहन लँगरनं चाहत्यांना केलं होतं. परंतु, 'चुकीला माफी नाही' असाच क्रिकेटप्रेमींचा पवित्रा दिसतोय.
आता पुढचा काही काळ आपल्याला अशी टिंगल, टीका सहन करावी लागणार, याची वॉर्नर-स्मिथलाही कल्पना आहेच. परंतु, या खिल्लीनं विचलित न होण्याचा निर्धारच या दोघांनी केल्याचं पहिल्या सामन्यात पाहायला मिळालं. अफगाणिस्तानविरुद्ध टिच्चून फलंदाजी करत वॉर्नरनं ८९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियानं हा सामना सात विकेट्सनी जिंकला.