कराची, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारत आणि पाकिस्तान हे दोन शेजारी क्रिकेटच्या मैदानावर समोरासमोर आले की वातावरण आपसूकच तापते. दोन्ही देशातील खेळाडू मैदानावर प्रतिस्पर्धी प्रमाणेच उतरतात, परंतु मैदानाबाहेर जणू दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये युद्ध छेडलेले असते. त्यात वर्ल्ड कप सारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत उभय संघ समोर आले तर मग विचारायलाच नको... इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान हा हाय व्होल्टेज सामना होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी जय्यत तयारी केली आहे. दोन्ही संघ 'आरे ला कारे' करण्यासाठी सज्ज आहेत. याची प्रचिती आतापासूनच येऊ लागली आहे. पाकिस्तान संघाचा कर्णधार सर्फराज अहमदने आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला पराभवाची चव चाखवू असा निर्धार बोलून दाखवला आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात 16 जूनला ओल्ड ट्रॅफर्ड येथे होणार आहे. दोन्ही संघांनी वर्ल्ड कप स्पर्धेकरीता तुल्यबळ खेळाडूंची निवड केली आहे. त्यामुळे आगामी काळात कोणाची कामगिरी सरस ठरते, याची उत्सुकता लागली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर एक ट्वेंटी-20 व पाच वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यामुळे तेथील वातावरणाशी जुळवून घेण्यास त्यांना मदत मिळणार आहे. या मालिकेसाठी पाक संघ लवकरच इंग्लंडसाठी रवाना होणार आहे. तत्पूर्वी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत अहमद याने भारतीय संघाला नमवण्याचा निर्धार व्यक्त केला. तो म्हणाला,''संघातील प्रत्येक खेळाडूला भारताविरुद्ध विजय मिळवायचा आहे. पण, वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रत्येक सामना आम्ही भारताविरुद्धच खेळतोयं अस समजून मैदानात उतरणार आहोत.''
वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तान संघाची भारताविरुद्धची कामगिरी निराशाजनकच झालेली आहे. पाकिस्तानला वर्ल्ड कप स्पर्धेत भारताविरुद्ध एकही विजय मिळवता आलेला नाही. तरीही अहमदने यावेळी निकाल वेगळा असेल असा विश्वास व्यक्त केला. ''वर्ल्ड कप स्पर्धेत आम्हाला भारताविरुद्ध विजय मिळवता आलेला नाही, हे सत्य आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या आयसीसीच्या स्पर्धेत आम्ही त्यांना नमवण्याचा पराक्रम केला आहे आणि याची पुनरावृत्ती वर्ल्ड कपमध्येही होऊ शकते,''असे तो म्हणाला.
संघाचे मुख्य प्रशिक्षक मिकी ऑर्थर म्हणाले की,''आक्रमण हीच आमची रणनीती आहे. सर्व आघाडींवर दमदार कामगिरी करण्याचा आमचा निर्धार आहे.''
Web Title: ICC World Cup 2019 : We will play every match at the World Cup as though we are facing India, Sarfaraz Ahmed
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.