मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांत भारतीय संघ आघाडीवर आहे. बुधवारी भारतीय संघ लंडनसाठी रवाना होणार आहे, तर 5 जूनला भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. तत्पूर्वी भारतीय संघ न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्याविरुद्ध सराव सामना खेळणार आहे.
वर्ल्ड कप स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी कोहलीनं भारतीय जवानांच्या योगदानाचे कौतुक केले आणि हा वर्ल्ड कप जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला. तो म्हणाला,''आपल्याला अनेक गोष्टींतून प्रेरणा मिळत असते, परंतु भारतीय जवानांकडून मिळणाऱ्या प्रेरणेची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. भारतासाठी ते आपल्या प्राणाचाही त्याग देतात, त्यांच्या बलिदानाला सलाम. त्यामुळे त्यांच्यासाठी काही करता आले, तर ते आमचे भाग्यच समजू. हा वर्ल्ड कप त्यांच्यासाठी जिंकायचा आहे.''