लंडन, आयसीसी वर्ल्डकप 2019 : या वर्ल्डकपमध्ये सर्वात धोकादायक संघ हा वेस्ट इंडिजचा ओळखला जातो आणि या गोष्टीचा प्रत्यय आजही आला. आज वेस्ट इंडिजचा सराव सामना न्यूझीलंडबरोबर होता आणि यावेळी त्यांनी चक्क 421 धावा चोपून काढल्याचे पाहायला मिळाले.
न्यूझीलंडने या सामन्यात नाणेफेक जिंकत वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केल्याचे पाहायला मिळाले. पण त्यांचा हा निर्णय अंगलट आल्याचे पाहायला मिळाले. कारण वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी यावेळी धडाकेबाज फलंदाजी करत न्यूझीलंडच्या नाकीनऊ आणले.
वेस्ट इंडिजला झंझावाती सुरुवात करून दिली ती ख्रिस गेलने. न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा समाचार घेत गेलने 22 चेंडूंत 36 धावा केल्या. त्यानंतर इव्हिन लुइसने अर्धशतक झळकावले. शाई होपने तर 86 चेंडूंत 101 धावांची शतकी खेळी साकारली.
अखेरच्या षटकांमध्ये वेस्ट इंडिजने न्यूझीलंडच्या गोलंदाजीवर जबरदस्त प्रहार केला. आंद्रे रसेलने तर आयपीएलचा फॉर्म कायम राखला आणि 25 चेंडूंत 54 धावांची खेळी साकारली. अॅश्ले नर्स आणि कार्लोस ब्रेथवेट यांनीही वेस्ट इंडिजला धावसंख्या फुगवण्यात चांगली भूमिका बजावली. न्यूझीलंडकडून मॅट हेन्री महागडा ठरला, कारण त्याने 107 धावा दिल्या. पण ट्रेंट बोल्टने मात्र वेस्ट इंडिजच्या चार फलंदाजांना बाद केले.
अबकी बार झाले 300 पार; राहुल आणि धोनी यांची शतके
लोकेश राहुल आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या दमदार शतकाच्या जोरावर भारताने दुसऱ्या सराव सामन्यात तिनशे धावांचा आकडा पार केला. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारताची आश्वासक सुरुवात झाली नसली तरी राहुल आणि धोनी यांच्या शतकाच्या जोरावर भारताने 359 धावांपर्यंत मजल मारली आहे. धोनीने 78 चेेंडूंत आठ चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर 113 धावांची शतकी खेळी साकारली. राहुलने 99 चेंडूंत 12 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 108 धावांची खेळी केली.
बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. या सामन्यातही सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा आपली छाप पाडू शकले नाहीत. विराट कोहलीने 47 धावा केल्या, पण त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. पण त्यानंतर राहुल आणि धोनी यांची चांगलीच जोडी जमली. या जोडीने पाचव्या विकेटसाठी 164 धावांची दमदार भागीदारी रचली.
भारताला यावेळी चौथ्या क्रमांकाचे दडपण होते. पण राहुलने शतक झळकावत या स्थानाला न्याय दिल्याचे म्हटले जात आहे. राहुलने 99 चेंडूंत 12 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 108 धावांची खेळी साकारली. धोनीनेही राहुलला चांगली साथ दिली. राहुल बाद झाल्यावरही धोनीने जोरदार फटकेबाजी करत आपले शतक पूर्ण केले.