लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेलने दमदार सुरुवात करून दिल्यावरही वेस्ट इंडीजचा डाव गडगडला. वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी ऐनवेळी कच खाल्ल्यामुळे त्यांचा डाव २१२ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडपुढे २१३ धावांचे आव्हान असेल.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. वेस्ट इंडिजच्या गेलने ३६ धावांची दमदार खेळी साकारली खरी, पण त्याला अन्य फलंदाजांची चांगली साथ मिळाली नाही. निकोलस पुरनने तीन चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ६३ धावांची खेळी साकारली. यावेळी पुरनला हेटमायरची (३९) चांगली साथ मिळाली, पण ही जोडी जास्त काळ खेळपट्टीवर तग धरू शकली नाही.
इंग्लंडच्या मार्क वुड आणि जोफ्रा आर्चर यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले. वुडने वनडे क्रिकेटमधील बळींचे अर्धशतक यावेळी पूर्ण केले.