लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : बेभरवश्याचा संघ असे वेस्ट इंडिजला म्हटले जाते आणि तेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पाहायला मिळाले. आक्रमक खेळण्याची गरज नसताना वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी मोठे फटके मारत पराभव ओढवून घेतला. ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजपुढे 289 धावांचे आव्हान ठेवले होते. ऐनवेळी कच खाण्याच्या वृत्तीमुळे वेस्ट इंडिजला पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाचा हा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने यावेळी वेस्ट इंडिजचा अर्धा संघ गारद केला.
ऑस्ट्रेलियाच्या 289 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची चांगली सुरुवात झाली नाही. त्यांना दुसऱ्याच षटकात पहिला धक्का बसला. त्यानंतर धडाकेबाज ख्रिस गेलला दोनदा पंचांनी बाद दिले, पण गेलने दोन्ही वेळा या निर्णयाविरोधात दाद मागितली आणि यामध्ये तो यशस्वी ठरला. त्या़नंतर तिसऱ्यांदा पंचांनी गेलला बाद दिले आणि रीव्ह्यूनंतर गेलला बाद देण्यात आले. पण हा निर्णयही नंतर वादग्रस्त असल्याचे पाहायला मिळाले.
शाई होप आणि निकोलस पुरन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी रचत संघाला स्थैर्य मिळवून दिले. होपने 68 धावांची खेळी साकारत संघाची विजयाची आशा कायम ठेवली. त्यानंतर कर्णधार जेसन होल्डरने दमदार फलंदाजी करत 51 धावांची खेळी साकारली. पण संघाला जेव्हा गरज होती तेव्हा त्याने आपली विकेट बहाल केली आणि वेस्ट इंडिजचा संघ पराभवाच्या वाटेवर आला. आंद्रे रसेल आणि कार्लोस ब्रेथवेट यांनी फटकेबाजी करण्याच्या नादात आपल्या विकेट बहाल केल्या.
एकेकाळी 4 बाद 38 अशी परिस्थिती असलेल्या ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात भन्नाट पुनरागमन केले. स्टीव्हन स्मिथ आणि नॅथन कल्टर निल यांनी दमदार खेळी साकारत ऑस्ट्रेलियाला तारले. त्यामुळे त्यांना वेस्ट इंडिजपुढे 289 धावांचे आव्हान ठेवता आले. कल्टर निलचे शतक यावेळी फक्त आठ धावांनी हुकले. कल्टर निलने 60 चेंडूंत 8 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 92 धावा फटकावल्या.
वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. हा निर्णय योग्य असल्याचे वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी सुरुवातीला दाखवून दिले. कारण फक्त 38 धावांमध्ये वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी डेव्हिड वॉर्नर, आरोन फिंच, ग्लेन मॅक्सवेल आणि उस्मान ख्वाजा यांना गमावले. पण त्यानंतर स्टीव्हन स्मिथने नांगर टाकत संघाची पडझड थांबवली.
स्मिथने यष्टीरक्षक अॅलेक्स कॅरीबरोबर (45) सहाव्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी रचली. त्यानंतर स्मिथ आणि कल्टन निल यांची जोडी तर चांगलीच जमली. पण शेल्डन कॉट्रेलने अप्रतिम झेल पकडत स्मिथला बाद केले. स्मिथने सात चौकारांच्या जोरावर 73 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली.
स्मिथ बाद झाल्यावरही कल्टर निलने ऑस्ट्रेलियाची धावसंख्या फुगवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. यावेळी कॉल्टर निल हा स्मिथपेक्षा आक्रमक खेळत असल्याचे पाहायला मिळाले. वेस्ट इंडिजकडून शाई होप आणि कॉट्रेल यांच्याकडून अप्रतिम झेल पाहायला मिळाले.