लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : ऐन वेळी कच खात वेस्ट इंडिजचा संघ श्रीलंकेविरुद्धच्या लढतीत पराभव पत्करावा लागला. श्रीलंकेने वेस्ट इंडिजपुढे 339 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना निकोलस पुरनने शतक झळकात संघाच्या आशा कायम ठेवल्या होत्या. पण मोक्याच्या क्षणी पुरन बाद झाला आणि वेस्ट इंडिजच्या हातून सामना निसटला. पुरनने 11 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 118 धावांची धडाकेबाज खेळी साकारली.
अविष्का फर्नांडोच्या शतकाच्या जोरावर श्रीलंकेने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात तिनशे धावांचा पल्ला पार केला. अविष्काचे शतक आणि कुशल परेराच्या अर्धशतकाच्या जोरावर श्रीलंकेला प्रथम फलंदाज करताना 338 धावांपर्यंत मजल मारता आली.
वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून श्रीलंकेला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. श्रीलंकेच्या दिमुथ करुणारत्ने आणि परेरा यांनी यावेळी 93 धावांची दमदार सलामी दिली. वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरने यावेळी करुणारत्नेला बाद करत श्रीलंकेला पहिला धक्का दिला. यानंतर काही वेळातच परेराही बाद झाला. परेराने 51 चेंडूंत 8 चौकारांच्या जोरावर 64 धावा केल्या.
दोन्ही सलामीवीर काही फरकाच्या अंतरावर बाद झाल्यामुळे श्रीलंकेचा डाव आता लवकर आटोपणार, असे काही जणांना वाटत होते. पण अविष्काने यावेळी शतक झळकावत श्रीलंकेच्या संघाला तिनशे धावांचा पल्ला गाठून दिला. अविष्काने 103 चेंडूंत 9 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 104 धावा केल्या. अविष्काचे हे पहिलेच शतक ठरले.
या फोटोमध्ये दडलंय काय, जाणून घ्या...यंदाच्या विश्वचषकात काही मोजकेच फोटो असे आहेत की जे कायम स्मरणात राहतील. हा फोटो त्यापैकी एक. या फोटोमध्ये श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा आणि वेस्ट इंडिजचा धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेल दिसत आहेत. पण या फोटोमध्ये काही तरी दडलंय, असं सांगितलं तर...
मलिंगाने या सामन्यात भेदक मारा करत वेस्ट इंडिजच्या दोन फलंदाजांना माघारी धाडले. पण हा भेदक मारा करत असताना मलिंगाला गेलला आऊट करता आले नाही. दुसरीकडे गेलला मलिंगाच्या गोलंदाजीवर मोठे फटके मारता आले नाहीत. हे दोघेही अनुभवी खेळाडू असून त्यांनी क्रिकेट विश्वात आपले स्थान अबाधित राखले आहे. या फोटोमधील या दोन्ही महान खेळाडूंनी आतापर्यंत 785 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. हेच या फोटोचे महत्व आहे.