Join us  

ICC World Cup 2019 : बांगलादेश 2007 व 2015चं गणित यंदाही जुळवणार, भल्याभल्यांना पाणी पाजणार?

ICC World Cup 2019 : बांगलादेशनं वर्ल्ड कप स्पर्धेत अविश्वसनीय सुरुवात केली. सलामीच्या सामन्यात त्यांनी बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला पाणी पाजलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2019 12:53 PM

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : बांगलादेशनं वर्ल्ड कप स्पर्धेत अविश्वसनीय सुरुवात केली. सलामीच्या सामन्यात त्यांनी बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला पाणी पाजलं. आफ्रिकेविरुद्ध 330 धावांचा डोंगर उभा करून बांगलादेशने वन डे क्रिकेटमधील त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. शिवाय त्यांनी आफ्रिकेला 21 धावांनी पराभव पत्करण्यास भाग पाडले. गोलंदाजी व फलंदाजी या आघाड्यांवर बांगलादेशने पैकीच्या पैकी गुण मिळवले, परंतु त्यांना क्षेत्ररक्षणात आणखी सुधारणा करण्याची गरज आहे. बांगलादेशने पहिला सामना जिंकणे, म्हणजे अन्य संघांसाठी धोक्याचा इशारा असल्याचे वर्ल्ड कप स्पर्धेचा इतिहास सांगतो. त्यामुळे यंदाच्या बदललेल्या फॉरमॅटमध्ये हा संघ कोणला पाणी पाजतो, याची उत्सुकता लागली आहे.

तमीम इक्बाल व सौम्या सरकार यांनी पहिल्या विकेटसाठी 60 धावा जोडल्या.  त्यानंतर शकिब व मुशफिकर यांनी आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 142 धावांची भागीदारी केली. वर्ल्ड कप स्पर्धेतील ही बांगलादेशच्या फलंदाजांनी केलेली सर्वोत्तम भागीदारी ठरली. इम्रान ताहीरने ही जोडी तोडली. त्याने शकिबला 75 धावांवर बाद केले. त्यानंतर मोहम्मद मिथून ( 21) माघारी परतला. मुशफिकर एका बाजूनं खिंड लढवत होता, परंतु त्याची ही घोडदौड फेहलुक्वायोनं रोखली. 43व्या षटकात फेहलुक्वायोनं 78 धावा करणाऱ्या मुशफिकरला बाद केले.  महमदुल्लाहने नाबाद 46 धावांची खेळी केली. 

प्रत्युत्तरात एडन मार्कराम ( 45), कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस ( 62), डेव्हिड मिलर ( 38), व्हॅन डेर ड्यूसन ( 41) आणि जेपी ड्यूमिनी ( 45) यांना चांगली खेळी करूनही आफ्रिकेला विजय मिळवून देता आला नाही. बांगलादेशने या विजयासह अन्य संघांना धोक्याचा इशारा दिला आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत विजयी सलामी दिल्यानंतर बांगलादेशने पुढील फेरीत प्रवेश करण्याचा विक्रम केला आहे. त्यामुळे यंदाही त्यांच्याकडून या चमत्काराची अपेक्षा करण्यास काही हरकत नाही. पण, असे झाल्यास एका बलाढ्य संघाला सेमी फायनलच्या तिकीटापासून वंचित रहावे लागेल आणि तो कोण असे हे येणारा काळच सांगू शकतो. बांगलादेशने 2007 व 2015 मध्ये पहिल्या सामन्यात विजय मिळवला होता आणि त्यात अनुक्रमे सुपर 8 व उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी प्रवेश केला होता. 

 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019बांगलादेश