Join us  

ICC World Cup 2019: भारत आणि न्यूझीलंड सामना रद्द झाला तर कोण जाणार अंतिम फेरीत, जाणून घ्या...

जर आता उपांत्य फेरीत पाऊस पडला तर भारतीय संघाचे नेमके काय होणार, याची चिंता चाहत्यांना आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 9:07 PM

Open in App

लंडन, आयसीसीवर्ल्ड कप 2019 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये पहिला उपांत्य फेरीचा सामना मंगळवारी होणार आहे. यापूर्वी साखळी फेरीत भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना पावसामुळे वाया गेला होता. पण आता भारत आणि न्यूझीलंड यांची गाठ उपांत्य फेरीत पडणार आहे. पण हा सामना रद्द झाला तर अंतिम फेरीत कोणता संघ पोहोचणार, याची उत्सुकता तुम्हाला असेल.

यापूर्वी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषकातील सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला होता. पण आता उपांत्य फेरीतील सामना जर पावसामुळे रद्द झाला तर काय होणार, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना 9 जुलैला खेळवण्यात येणार आहे. जर या दिवशी पाऊस पडला, तर त्यासाठी 10 जुलै हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. पण या दिवशीही पाऊस पडला तर काय होणार, हा प्रश्न चाहत्यांना पडला असेल. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना आता ही गोष्ट सर्वात जास्त चिंतेत पाडणारी आहे. कारण आतापर्यंत भारताने सर्वाधिक सामने जिंकले आहेत. त्यामुळे जर आता उपांत्य फेरीत पाऊस पडला तर भारतीय संघाचे नेमके काय होणार, याची चिंता चाहत्यांना आहे.

पावसामुळे जर हा सामना रद्द करण्याची पाळी आली, तर दोन्ही संघांतील सामन्यात नेमके काय झाले हे पाहावे लागते. पण भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील साखळी सामना पावसामुळे रद्द झाला होता, त्यामुळे या सामन्याचा निकाल महत्वाचा ठरत नाही. त्यामुळे आता उपांत्य फेरीचा सामना रद्द झाला तर गुणतालिका पाहिली जाईल. गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे. दुसरीकडे न्यूझीलंडचा सामना चौथ्या स्थानावर आहे.त्यामुळे उपांत्य फेरीचा सामना रद्द झाला तर भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचेल. त्यामुळे हा सामना जर रद्द झाला तर त्यामध्ये न्यूझीलंडचे नुकसान होणार आहे. त्यामुळे आता उपांत्य फेरीचा सामना रद्द झाला तर भारताला घाबरण्याचे काहीच कारण नाही.