- बाळकृष्ण परब
आयपीएलचा ज्वर ओसरल्यानंतर आता क्रिकेटप्रेमींना वेध लागले आहेत ते आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे. बारावी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा येत्या ३० मेपासून इंग्लंडमध्ये आयोजित होत आहे. क्रिकेटचा जन्मदाता देश असलेल्या इंग्लंडमध्ये तब्बल पाचव्यांदा आयोजन होत असल्याने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातच मोजक्या संघांना दिलेला प्रवेश आणि बदललेले स्वरूप यामुळे यंदाची विश्वचषक स्पर्धा चुरशीची होण्याची शक्यता आहे.
क्रिकेट म्हणजे आपल्या देशाचा जीव की प्राणच. सध्या तरुणाईमध्येही क्रिकेटची क्रेझ दिसून येत आहे. कट्ट्याकट्ट्यावर ३० मेपासून सुरू होणाऱ्या वर्ल्डकपच्या गप्पा रंगू लागल्या आहेत. वर्ल्डकप कोण जिंकणार? कुठल्या टीम्स यंदा फेव्हरिट आहेत. कुठला खेळाडू चमकणार, यावर पैजा लागत आहेत. तरुणाईच्या मनाचा कानोसा घेतला तर यंदा टीम इंडियासोबत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या टीम्सबाबत त्यांच्या मनात उत्सुकता आहे. तर भारतीय संघाचा विचार केल्यास विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराकडून त्यांना चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
याआधी दोन वेळा विश्वचषकाला गवसणी घालणारा आपला भारतीय संघही या वेळी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली सज्ज झाला आहे. गेल्या एक-दोन वर्षांपासून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाची कामगिरी दमदार होत असल्याने भारताला विश्वविजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात रोहित शर्मा, शिखर धवन, स्वत: कर्णधार विराट कोहली, लोकेश राहुल, केदार जाधव अशी फलंदाजांची तगडी फळी आहे. सोबतीला हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा हे अष्टपैलू आणि महेंद्रसिंग धोनीसारखा चाणाक्ष आणि अनुभवी यष्टीरक्षक आहे. जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी ही मंडळी इंग्लंडमधील गोलंदाजीला अनुकूल हवामानाचा लाभ उठवत प्रतिस्पर्धी संघांची दाणादाण उडवू शकतात. तर युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव प्रतिस्पर्ध्यांची फिरकी घेण्याची क्षमता बाळगून आहेत. त्यामुळे एकंदरीत बलाबल पाहता भारतीय संघाचा सामना करणे प्रतिस्पर्ध्यांसाठी आव्हान ठरणार आहे.
इतर संघांचा विचार केल्यास यजमान इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे संघ या वेळी ब-यापैकी संतुलित दिसत आहेत. त्यातही इंग्लंडचा संघ कांकणभर सरस आहे. दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि पाकिस्तान यांनाही कमी लेखून चालणारे नाही. तर अफगाणिस्तान आणि बांगलादेश यंदाच्या स्पर्धेत धक्कादायक निकाल नोंदवण्याची दाट शक्यता आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे गेल्या काही विश्वचषक स्पर्धांपेक्षा यंदाची स्पर्धा थोडी वेगळी ठरणार आहे. त्याचं कारण म्हणजे यंदाच्या स्पर्धेत केवळ पहिल्या दहा संघांनाच प्रवेश देण्यात आलाय. तसेच स्पर्धेच्या स्वरूपातही व्यापक बदल करण्यात आला आहे. या वेळच्या विश्वचषकात १९९२ नंतर प्रथमच राउंड रॉबिन पद्धतीने सामने खेळवण्यात येतील. त्यामुळे स्पर्धेत सहभागी असलेला प्रत्येक संघ एकमेकाविरुद्ध खेळेल. तर प्राथमिक फेरीत पहिल्या चार स्थानांवर राहणारे संघ थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. त्यामुळे यंदा सर्वच संघांना उपांत्य फेरी गाठण्याची समान संधी मिळणार आहे. साहजिकच स्पर्धेत चुरसही अधिक दिसून येणार आहे.
विशेष म्हणजे सर्वच संघ एकमेकांविरुद्ध खेळणार असल्याने या वेळी अनेक रंगतदार लढतीही पाहायला मिळणार आहेत. त्याची सुरुवात ३० मे रोजी होणाºया इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सलामीच्या लढतीने होईल. पुढे ५ जूनला होणारी भारत आणि दक्षिण आफ्रिका, ९ जूनला होणारी भारत आणि आॅस्ट्रेलिया, १३ जूनला होणारी भारत आणि न्यूझीलंड, २५ जूनला होणारी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया, ३० जूनला होणारी भारत आणि यजमान इंग्लंड आणि ६ जुलै रोजी होणारी आॅस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या लढती विशेष लक्षवेधी ठरणार आहेत. मात्र सर्वात खास ठरणार आहे ती भारत आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान यांच्यातील लढत. पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकात अपराजित राहिलेला भारतीय संघ १६ जून रोजी होणा-या या लढतीत विजय मिळवून विजयी घोडदौड कायम राखतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
एकंदरीत आधीच्या विश्वचषक स्पर्धांपेक्षा यंदाची विश्वचषक स्पर्धा वेगळी ठरणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघालाही कडव्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. आता आपला भारतीय संघ हे आव्हान परतवून तिसऱ्यांदा विश्वचषक उंचावतो का, याचे उत्तर येत्या काही दिवसांत मिळेलच. तूर्तास या आठवड्यापासून सुरू होत असलेल्या क्रिकेट विश्वचषकाचा आनंद घेण्यास सज्ज व्हा.
वर्ल्डकप कोण जिंकणार मुंबईकर तरुणाई म्हणते...
आता ओढ लागली आहे ती वर्ल्डकपची. भारतीय संघ हा आवडीचा संघ सहभागी असल्यामुळे तोच जिंकणार, असं मला वाटतं. हार्दिक पांड्या हा खेळाडू जास्त चमकेल आणि मॅच बघायला आवडेल ती म्हणजे भारत आणि पाकिस्तान.
- वैष्णवी शिवणेकर, चिंचपोकळी
मला इंडियन क्रिकेट टीम आवडते, पण इंग्लंड या वर्षी वर्ल्ड कप जिंकेल असं वाटतंय. जसप्रीत बुमराह यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये चमकेल. भारत-पाकिस्तान मॅच पाहायला खूप आवडेल
- हर्ष सावंत, शीव
वर्ल्डकप २०१९ हा भारतच जिंकेल असं वाटतं. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये जसप्रीत बुमराह बाजी मारून जाईल कदाचित. आणि सामना बघायचा तर भारत-पाकिस्तान सामना बघायला मज्जा येईल.
- नंदिनी परब, भांडुप
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये भारत, आॅस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे संघ आवडीचे आहेत. मात्र बांगलादेश आणि अफगाणिस्तानचे संघ यंदा चमत्कारिक निकाल नोंदवू शकतात. विशेषत: इंग्लंड आणि भारत यांच्यात ३० जूनला होणारी लढत रंगतदार होईल. तसेच मुंबईकर रोहित शमार्चा फॉर्म यंदा टीम इंडियासाठी निर्णायक ठरू शकतो.
- कुशल गवाणकर, बोरीवली
खूप फेरबदल केल्याने यंदाचा वर्ल्डकप विशेष ठरणार आहे. यंदा इंग्लंड आणि आॅस्ट्रेलियाचे संघ कमाल करू शकतात. मात्र विराट कोहलीने जबरदस्त खेळ केल्यास भारतीय संघही भारी पडेल.
- लक्ष्मण मांजरेकर, अंबरनाथ
वर्ल्डकपमध्ये आवडता संघ म्हणजे भारत. भारताच्या संघात सगळेच उत्तम खेळाडू आहेत, पण त्यात या वर्षी हार्दिक पांड्या चमकेल आणि भारत-पाकिस्तान सामना बघायला मज्जा येईल.
- धनश्री ढोके, भांडुप
Web Title: ICC World Cup 2019: Who will win this years cricket World Cup, Mumbaikar Youth Says...
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.