-ललित झांबरे
क्रिकेटचा सामना, तो कोणत्याही स्तराचा असो, त्यात आधीचे सर्व फलंदाज ढेपाळले असतील आणि शेवटच्या म्हणजे 11 व्या क्रमांकावरील फलंदाज डावात सर्वाधिक धावा करत असेल तर आश्चर्यच म्हणावे लागेल. अशा आश्चर्याच्या खेळी अगदीच मोजक्या म्हणून अतिविशेष! आणि मर्यादीत षटकांच्या सामन्यात, तेही विश्वचषक स्पर्धेत कुणी अशी खेळी करत असेल तर ते अतिअतिविशेष!!
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात अशा अतिअतिविशेष खेळी करणारे तीनच फलंदाज आहेत. पहिला म्हणजे पाकिस्तानचा शोएब अख्तर, दुसरा न्यूझीलंडचा जीतन पटेल आणि तिसरा म्हणजे वेस्ट इंडिजचा जोएल गार्नर...आता हे तिघे म्हणजे गोलंदाज..पण ते डावात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज ठरले हे आश्चर्यच नाही का?
रावळपिंडी एक्सप्रेस शोएबची खेळी 2003 च्या विश्वचषक स्पर्धेतील. केपटाऊनच्या सामन्यात इंग्लंडविरुध्द 11 व्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने 43 धावा केल्या. आधीच्या दहापैकी एकाही फलंदाजाला याच्या जवळपासही धावा करता आल्या नव्हत्या. शोएबनंतर सर्वाधिक खेळी होती ती सलामीवीर सईद अन्वरच्या 29 धावांची. म्हणजे या सामन्यात पाकिस्तानच्या डावात शेवटच्या फलंदाजाने सर्वाधिक आणि पहिल्या क्रमांकाच्या फलंदाजाने दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा केल्या. मधले सगळे ढेपाळले असा हा वैशिष्ट्यपूर्ण डाव. शोएबच्या 43 धावांमूळे पाकिस्तानला 134 पर्यंत मजल मारता आली पण सामना त्यांनी 112 धावांनी गमावला.
दुसरा नंबर 11 हायेस्ट स्कोअरर विंडीजचा जोएल गार्नर. गार्नरने 1983 च्या विश्वचषक स्पर्धेत मँचेस्टर येथे भारताविरुध्द 37 धावा केल्या. याच डावात अँडी रॉबर्टसनेही 37 धावा केल्या पण रॉबर्टस् खेळला नवव्या क्रमांकावर आणि गार्नर खेळला 11 व्या क्रमांकावर. या दोघांशिवाय इतर ढेपाळले. गार्नर व रॉबर्टस् यांनी शेवटच्या गड्यासाठी 71 धावा जोडल्या म्हणून विंडीजला 228 धावांपर्यंत मजल मारता आली पण सामना त्यांनी 54 धावांनी गमावला. विश्वचषक स्पर्धेत विंडीज संघ प्रथमच पराभूत झाला पण गार्नरच्या खेळीमुळे हा सामना लक्षात राहिला.
न्यूझीलंडच्या जीतन पटेलची खेळी 2007 च्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यातली. किंग्स्टन येथील श्रीलंकेविरुध्दच्या त्या सामन्यात 289 धावांच्या उत्तरात किवींच्या 9 बाद 149 अशा स्थितीनंतर पराभव निश्चित होता. अशावेळी जीतन पटेल फलंदाजीला आला आणि त्याने 38 चेंडूत दोन चौकार व एक षटकारासह 34 धावा करत प्रतिकार केला. प्रतिकार करत करत तो डावात सर्वाधिक योगदान देणारा फलंदाज ठरला. तो पराभव काही टाळू शकला नाही पण ही खेळी नेहमीसाठी लक्षात राहिली.
Web Title: ICC World Cup 2019: Why are Shoaib Akhtar, Jeetan Patel and Joel Garner's innings is best in the World Cup?
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.