लंडन, आयसीसीवर्ल्ड कप 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेत मागील चार दिवसांत पावसामुळे तीन सामने रद्द करण्याची नामुष्की आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर ओढावली. त्यामुळे आयसीसीवर टीका होताना पाहायाला मिळत आहे. पावसामुळे सामना रद्द होत असल्यास राखीव दिवस का ठेवण्यात आला नाही, असा सवालही विचारण्यात येत आहे. आयसीसीनंही राखीव दिवस न ठेवण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.
सोमवारी वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. मंगळवारी श्रीलंका आणि बांगलादेश या सामन्यावरही पावसानं पाणी फिरवलं. याआधी 7 जूनला श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील सामनाही पावसामुळे रद्द करण्यात आला होता. वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासात सर्वाधिक सामने रद्द होण्याचा विक्रम यंदा नोंदवला गेला आहे.
यावर आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन म्हणाले की,''प्रत्येक सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला असता तर स्पर्धा लांबली असती आणि व्यावहारिक रुपात हे परवडणारे नव्हते. त्याने खेळपट्टीची तयारी, संघाला दुखापतीतून सावरण्याचा मिळणारा वेळ, राहण्याची सुविधा, पर्यटकांचा प्रवासाचा खर्च, या सर्वांना त्याचा फटका बसला असता. तसेच राखीव दिवशीही पाऊस पडणार नाही याची काय गॅरेंटी?''
बाद फेरीच्या सामन्यासाठी राखीव दिवस''हा बेभरवशी पाऊस आहे. येथे जूनमध्ये होणाऱ्या पावसाच्या तुलनेत अधिक पाऊस झाला आहे. 2018 मध्ये येथे 2 मिमी पावसाची नोंद झाली होती, परंत आता केवळ 24 तासांत 100 मिमी पाऊस पडला आहे. बाद फेरीच्या सामन्यांसाठी आम्ही राखीव दिवस ठेवला आहे,'' अशी माहिती रिचर्डसन यांनी दिली.