साऊदम्पटन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : पावसामुळे वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना रद्द करण्याचा निर्णय अखेर घेण्यात आला. त्यामुळे या दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात येणार आहे. या विश्वचषकात यापूर्वी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामना रद्द करण्यात आला होता.
यंदाच्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेला एकही सामना जिंकता आला नव्हता. पण पावसाच्या व्यत्ययामुळे त्यांचा वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना रद्द केला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला पहिला गुण मिळवता आला आहे. आता चार सामन्यांनंतर दक्षिण आफ्रिकेच्या खात्यात एक गुण जमा झालेला आहे.
या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकत दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले होते. त्यानंतर वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रेलने दक्षिण आफ्रिकेच्या दोन फंलंदाजांना माघारी धाडत त्यांची 2 बाद 28 अशी अवस्था केली होती. पण त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला एका धावेची भर घालता आली आणि पावसाचे आगमन झाले. त्यानंतर सहा तास पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवण्यात आला आणि अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.