लंडन : जेसन होल्डरच्या नेतृत्वात वेस्ट इंडिज संघ वेगवान गोलंदाजांच्या बळावर पाच वेळेचा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाविरुद्ध गुरुवारी विश्वचषकात गतवैभव पुन्हा मिळविण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. दोनवेळा चॅम्पियन राहिलेल्या वेस्ट इंडिजने पहिल्या सामन्यात पाकिस्तानला केवळ १०५ धावात गारद करीत सात गड्यांनी विजय नोंदविला होता. ओशाने थॉमस याने २७ धावात चार गडी बाद केले, तर आंद्रे रसेल, शेल्टन कोटरेल आणि कर्णधार होल्डर याने विजयात योगदान दिले.
विंडीजने १९७५ च्या विश्वचषकात अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला नमविले, त्यावेळी संघात चार वेगवान गोलंदाज होते. चार वर्षानंतर लॉर्डस्वर दुसऱ्यांदा फायनलमध्ये इंग्लंडला नमवून विंडीजने विजेतेपद कायम राखले होते. त्या संघातही अँडी रॉबर्टस्,मायकेल होल्डिंग, कोलिन क्रॉफ्ट आणि जोएल गॉर्नर या दिग्गजांचा समावेश होता. सध्याच्या संघात त्या दर्जाचे गोलंदाज नसले तरी केमार रोच आणि शेरॉन गॅब्रियल यांच्याविना खेळणाºया विंडीजने पाकचा गाशा गुंडाळून अद्याप गोलंदाजीत दम असल्याचे दाखवून दिले. विंडीज संघ यंदाच्या विश्वचषकात पात्रता फेरीचा अडथळा पार करून आला, पण त्यांचा दिवस असेल तर ते कुठल्याही संघाला लोळवू शकतात,याचा प्रत्यय संघाने दिला.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानवर सात गड्यांनी विजय नोंदविला, पण विंडीजविरुद्ध त्यांना सोपे जाणार नाही. मागील तीनपैकी दोन टी२० विश्वचषकाचा विजेता असलेल्या विंडीजकडून थॉमसने सराव सामन्यात डेव्हिड वॉर्नरला जाळ्यात अडकविले होते.बाऊन्सरचा वारंवार मारा करणे हा विंडीजचा कमकुवतपणा म्हणावा लागेल. असे चेंडू खेळण्यात स्टीव्ह स्मिथ आणि वॉर्नर हे ऑस्ट्रेलियाचे हुकमी फलंदाज तरबेज मानले जातात.
विंडीजला दोन विश्वचषक जिंकून देणारे माजी कर्णधार क्लाईव्ह लॉईड म्हणाले, ‘ऑस्ट्रेलिया चांगला संघ आहे. या दडपणाचा विंडीज कसा सामना करेल, यावर निकाल अवलंबून असेल.’१) दोन्ही संघांदरम्यान सन १९७५ पासून आतापर्यंत १३९ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने झाले असून त्यापैकी ऑस्ट्रेलियाने ७३ सामने, तर वेस्ट इंडिजने ६० सामने जिंकले आहेत. तीन सामने टाय झाले आहेत. याशिवाय ३ सामने अनिर्णित राहिले आहेत.
२)दोन्ही संघांमधील शेवटच्या पाच लढतींपैकी चार सामने ऑस्ट्रेलियाने, तर एका सामन्यात वेस्ट इंडिजने विजय मिळविला आहे.
३)दोन्ही संघांदरम्यान विश्वचषकामध्ये आतापर्यंत नऊ सामने झाले असून त्यापैकी पाच सामन्यांमध्ये बाजी मारुन वेस्ट इंडिज पुढे आहे. ऑस्ट्रेलियाने चार सामने जिंकले आहेत.
४)ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत पाच वेळा विश्वचषक जिंकला आहे, तर वेस्ट इंडिजने १९७५ आणि १९७८चे पहिले दोन विश्वचषक जिंकले आहेत.
५) विश्वचषकामध्ये ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजविरुद्ध ३२२, तर वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाविरूद्ध २९१ धावा अशी सर्वाेच्च धावसंख्या उभारली आहे.
६) ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजविरुद्ध १११ धावांची नीचांकी खेळी केली असून वेस्ट इंडिजची नीचांकी धावसंख्या ११० आहे.