लॉर्ड्स, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : रोमहर्षक ठरलेल्या लढतीत यजमान इंग्लंडने सर्वाधिक चौकाराच्या मदतीनं न्यूझीलंडवर विजय मिळवून वर्ल्ड कप विजयाचा दुष्काळ संपवला. इंग्लंडने प्रथमच वर्ल्ड कप जिंकण्याचा मान पटकावला. यापूर्वी तीन वेळा अंतिम फेरीत पोहोचूनही इंग्लंडला जेतेपदाचा चषक उंचावता आला नव्हता. इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने ही ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली. त्यांच्या या यशात स्थानिक खेळाडूंपेक्षा बाहेरून आलेल्यांचाच मोठा वाटा आहे. जाणून घेऊया कसा...
ICC World Cup 2019 : क्रिकेट, ये खेल है महान!
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून 8 बाद 241 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संपूर्ण संघ 241 धावांवरच तंबूत परतला. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. यातही इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 15 धावा केल्या आणि प्रत्युत्तरात न्यूझीलंडला 15 धावा करता आल्या. सर्वाधिक चौकार मारल्यामुळे इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले. या सामन्यात बेन स्टोक्सने जीगरबाज खेळी केली. त्यानं 98 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकार लगावून 84 धावांची खेळी केली. त्यामुळे त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. तुम्हाला माहित आहे का, याच स्टोक्सचा जन्म हा न्यूझीलंडची राजधानी ख्राईस्टचर्च येथील आहे. स्टोक्स प्रमाणे इंग्लंडच्या वर्ल्ड कप संघात आणखी चार खेळाडू हे बाहेरच्या देशांतून आलेले आहेत.
न्यूझीलंडमध्ये जन्मलेल्या खेळाडूनं केला किवींचा पराभव; कोण आहे घर का भेदी?
जाणून घेऊया ते कोण आणि त्यांची कामगिरी...
बेन स्टोक्सचा जन्म हा न्यूझीलंड येथील ख्राईस्टचर्च येथील आहे. 4 जून 1991चा त्याचा जन्म. वयाच्या 12 व्या वर्षी तो इंग्लंडला स्थायिक झाला आणि येथूनच त्याच्या क्रिकेटला सुरुवात झाली. फलंदाजीत त्यानं 11 सामन्यांत 468 धावा केल्या आहेत. त्यात पाच अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय गोलंदाजीतही त्यानं 7 विकेट्स घेतल्या आहेत.
इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय याचा जन्म हा दक्षिण आफ्रिकेतील डर्बन शहरातील. 21 जुलै 1990 साली त्याचा जन्म झाला. वयाच्या 10 व्या वर्षी तो लंडनमध्ये स्थायिक झाला. इंग्लंडच्या अंतिम फेरीतील प्रवासात सलामीवीर रॉयचा महत्त्वाचा वाटा आहे. दुखापतीतून सावरत त्यानं इंग्लंडला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला. त्यानं 8 सामन्यांत 7 डावांत 443 धावा चोपल्या. त्यात एका दीडशतकी खेळीसह चार अर्धशतकंही आहेत.
कर्णधार इयॉन मॉर्गन हा मुळचा आयर्लंडचा... 10 सप्टेंबर 1986 मध्ये डुबलीन येथील त्याचा जन्म. त्यानं आयर्लंडचे वन डे सामन्यांतही प्रतिनिधित्व केले आहे. वयाच्या 16 व्या वर्षी त्यानं आयर्लंडकडून पदार्पण करताना स्कॉटलंडविरुद्ध 99 धावांची खेळी केली होती. पण, त्यानं इंग्लंडचे नागरिकत्व स्वीकारले आणि त्याच्याच नेतृत्वाखाली इंग्लंडने काल प्रथमच वर्ल्ड कप उंचावण्याचा पराक्रम केला. मॉर्गनने या स्पर्धेत 11 सामन्यांत 371 धावा केल्या आहेत. त्यात एका शतकी खेळीचा समावेश आहे.
जोफ्रा आर्चर... बार्बाडोस येथे 1 एप्रिल 1995 मध्ये आर्चरचा जन्म झाला... त्यानं क्रिकेटपटू बनण्यासाठी इंग्लंड गाठलं आणि आज तो वयाच्या 24 व्या वर्षी एकाच वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. त्यानं इंग्लंडच्या भल्याभल्या दिग्गजांना मागे टाकले. आर्चरने 11 सामन्यांत 20 विकेट्स घेतल्या आहेत. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.
टॉम कुरन... हाही दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वीच्या मालिकेत त्यानं अष्टपैलू कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले होते, परंतु त्याला वर्ल्ड कपमध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.