- बाळकृष्ण परब
अखेर सर्व अडथळे पार करत भारतीय क्रिकेट संघाने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. नुसती उपांत्य फेरी गाठली नाही तर साखळी फेरीत सात विजयांसह अव्वलस्थानी राहत दिमाखात विश्वविजेतेपदासाठी विराटसेनेने आपले आव्हान सिद्ध केलेय. गेल्या दोन तीन वर्षांपासून भारतीय संघ मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत असल्याने वर्ल्डकपमध्येही या संघाकडून तशाच कामगिरीची अपेक्षा होती. भारतीय संघानेही इंग्लंडविरुद्धच्या लढतीचा अपवाद वगळता संपूर्ण स्पर्धेत धडाकेबाज खेळ केलाय. अगदी आरामात उपांत्यफेरी गाठल्याने भारतीय संघ विश्वविजयापासून केवळ दोन पावले दूर आहे. पण ही दोन पावले विराटसेनेसाठी अत्यंत आव्हानात्मक ठरणार आहेत.
साखळीचा टप्पा सहज पार केल्यानंतर आता 9 जुलै रोजी होणाऱ्या उपांत्य लढतीत भारताची गाठ न्यूझीलंडशी पडणार आहे. आता न्यूझीलंडचे आव्हान परतवून लावत अंतिम सामन्याचे तिकीट पक्के करण्यासाठी भारतीय संघाला आपल्या आधीच्या चुका टाळाव्या लागतील. यंदाच्या वर्ल्डकपमधील भारतीय संघाच्या आतापर्यंतच्या कामगिरीचा आढावा घेतला तर काही बाबी ठळकपणे जाणवतात. त्यातील ठळक गोष्ट म्हणजे साखळी फेरीत भारतीय संघाची गोलंदाजी उत्तम झाली आहे. मात्र रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा अपवाद वगळता इतर फलंदाजांनी साफ निराशा केलीय. मधल्या फळीत तर आनंदीआनंदच आहे.
शिखर धवनच्या माघारीनंतर रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करणाऱ्या लोकेश राहुलने काही प्रमाणात सातत्य दाखवल्याने भारतीय संघव्यवस्थापनाला काही प्रमाणात दिलासा मिळालाय. मात्र स्पर्धेतील पहिल्या सामन्यापासूनच भारतीय संघाच्या मधल्या फळीत. स्थैर्य दिसून आलेले नाही. केदार जाधव, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक यांना संधी देऊनही चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावरील फलंदाजांचा प्रश्न सुटलेला नाही. त्यातच धोनीच्या फलंदाजीतील अतिबचावात्मक पवित्र्यामुळे इतर फलंदाजांवरील दबाव अधिकच वाढत आहे. मात्र हार्दिक पांड्याने फटकेबाजीत दाखवलेले सातत्य हीच भारतासाठी जमेची बाब आहे.
सेमीफायनलचा अडथळा पार करून फायनलसाठी सज्ज व्हायचे असेल तर भारतीय संघाला केवळ रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर अवलंबून राहणे परवडणारे नाही. त्यातही न्यूझीलंडकडे ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन आणि कॉलीन डिग्रँडहोम असे गोलंदाज असल्याने भारतीय फलंदाजांचा कस लागणार आहे.
या स्पर्धेत भारतीय संघासाठी सर्वात सकारात्मक ठरलेली बाब म्हणजे गोलंदाजी.
जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमीने गोलंदाजीत संघासाठी निर्णायक भूमिक बजावली आहे. या दोघांसोबत युझवेंद्र चहल आणि अष्टपैलू हार्दिक पांड्यानेही गोलंदाजीमध्ये बऱ्यापैकी चमक दाखवली आहे. साखळीत यजमान इंग्लंडविरुद्धच्या लढतीचा अपवाद वगळता प्रत्येक सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी फलंदाजांना जेरीस आणलेय. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य लढतीत भारतीय संघाची मदार ही मुख्यत्वेकरून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीवर असेल. त्यांच्या दिमतीला भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल आणि हार्दिक पांड्या असतीलच.
न्यूझीलंडच्या फलंदाजीला वेसण घालण्यासाठी मार्टिन गप्टिल, केन विल्यमसन आणि रॉस टेलर यांच्याविरोधात भारताच्या गोलंदाजांना विशेष रणनीती आखावी लागेल. स्पर्धेत मागे वळून पाहिल्यास न्यूझीलंडच्या तुलनेत भारतीय संघाने अधिक सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. मात्र उपांत्य फेरीसारख्या लढतीत आधीच्या कामगिरीपेक्षा त्या त्या दिवसाचा खेळ निर्णायक ठरतो. त्यामुळे भारतीय संघाला मंगळवारी स्पर्धेतील आधीची कामगिरी विसरून नव्याने खेळ करून दाखवावा लागेल.
Web Title: ICC World Cup 2019: World Cup for Team India is two steps away, but ....
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.