लंडन, आयसीसी वर्ल्डकप 2019 : भारतीय संघ वर्ल्डकप खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. भारतीय संघ कसून सरावही करत आहे. पण सध्याच्या घडीला भारताचा कर्णधार विराट कोहली हा एका गोलंदाजाचा चक्क फॅन झाला आहे. हा गोलंदाज भारतीय संघातील नसला तरी कोहलीला त्या गोलंदाजाने भूरळ पाडली आहे.
इंग्लंडमध्ये पोहोचल्यावर भारतीय संघाने नेट्समध्ये चांगला सराव केला. वर्ल्डकपला 30 जूनपासून सुरुवात होणार आहे. पण वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वीच कोहलीने एका गोलंदाजावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे. हा गोलंदाज नेमका कोण, याबद्दल साऱ्यांनाच उत्सुकता आहे.
वर्ल्डकपपूर्वी आयपीएल खेळवण्यात आली. आयपीएलमध्ये या गोलंदाजाने आपली चमक दाखवली होती. त्याबरोबर आपल्या राष्ट्रीय संघाकडून खेळतानाही या गोलंदाजाने दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे क्रिकेट जगतामध्ये या गोलंदाजाचा चांगलाच दबदबा आहे. हा गोलंदाज आहे अफगाणिस्तानचा फिरकीपटू रशिद खान.
रशिदबद्दल विराट म्हणाला की, " गेल्या तीन वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर मी रशिदविरुद्ध खेळलेलो नाही. मला रशिदविरुद्ध खेळायचे आहे. तो एक चांगला गोलंदाज आहे. जोपर्यंत फलंदाज कसा चेंडू खेळायचा विचार करतो, तोपर्यंत बॉल बॅटवर आलेला असतो. त्यामुळे रशिदच्या गोलंदाजीचा सामना करणे सोपे नाही. त्यामुळे मला त्याची गोलंदाजी आवडते आणि त्यामुळेच मला त्याच्या गोलंदाजीविरुद्ध खेळायचे आहे."
भारताने पाठवला आतापर्यंतचा सर्वात वयस्कर संघइंग्लंडमध्ये 30 मे पासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने आतापर्यंतचा सर्वात वयस्कर संघ पाठवला आहे. भारतीय संघाचे सरासरी वय 29.53 वर्ष असे आहे आणि त्यात महेंद्रसिंग धोनी ( 37 वर्ष) हा सर्वात वयस्कर, तर कुलदीप यादव ( 24 वर्ष) सर्वा युवा खेळाडू आहे. वर्ल्ड कपमध्ये सहभागी झालेल्या दहा संघांमध्ये श्रीलंका ( 29.9) आणि दक्षिण आफ्रिका ( 29.5) यांचा भारतापाठोपाठ क्रमांक येतो.1975 ते आतापर्यंतच्या वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंतचा हा वयस्कर संघ आहे. याआधी भारताने 2011 साली जो संघ वर्ल्ड कपमध्ये उतरवला होता त्याचे सरासरी वय 28.3 असे होते. 2011मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने वर्ल्ड कप उंचावला होता. त्यामुळे 2011प्रमाणे यंदाही भारतीय संघ वर्ल्ड कप जिंकेल का? 1983साली कपिल देवच्या नेतृत्वाखाली उतरलेला भारताचा संघ ( 27.10 वर्ष) वयस्कर होता आणि तेव्हाही भारताने वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता. त्यामुळे कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इतिहासाची पुनरावृत्ती करेल का, याची उत्सुकता आहे. विशेष म्हणजे वर्ल्ड कपमध्ये सहभागी झालेल्या भारताच्या युवा संघाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. 1975 मध्ये भारतीय संघाचे सरासरी वय 26.8 वर्ष, तर 1979 मध्ये 26.6 वर्ष होते. 1987 मध्ये हे वय 26.2, 1992 मध्ये 25.4 असे होते.