-ललित झांबरे विश्वचषक स्पर्धेत रविवारी इंग्लंडनेभारताचा 31 धावांनी पराभव केला आणि त्यासोबतच यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत एकही संघ अपराजीत राहणार नाही हे स्पष्ट झाले. निश्चितपणे विश्वविजेता कोणता न् कोणता संघ ठरेल, पण तो अपराजित नसेल हे निश्चित आहे. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात 1983, 1987, 1992, 1999, 2011 आणि 2015 च्या स्पर्धा अशाच होत्या. या स्पर्धांमध्ये एकही संघ अपराजित राहिलेला नव्हता.
1983 मध्ये भारताने कपिल देवच्या नेतृत्वात विश्वविजेतेपद पटकावले पण त्यावेळी आपला संघ साखळी फेरीत वेस्ट इंडिज व ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झालेला होता.
1987 च्या स्पर्धेत अॅलन बोर्डरचा ऑस्ट्रेलियन संघ जगज्जेता ठरला पण त्यांना यजमान भारताने दिल्लीच्या सामन्यात मात दिलेली होती.
1992 मध्ये तर इम्रान खानच्या नेतृत्वातील पाकिस्तानचा संघ साखळीत बादच होणार होता. वेस्ट इंडिज, भारत आणि दक्षिण आफ्रिकेकडून ते पराभूत झाले होते. इंग्लंडविरुध्दचा सामना झाला नव्हता मात्र शेवटच्या तीन साखळी सामन्यात ऑस्ट्रेलिया, श्रीलंका व न्यूझीलंडला मात देत ते उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले होते.
1999 मध्ये ऑस्ट्रेलियन संघ विश्वविजेता ठरला पण त्यांनी साखळी फेरीत न्यूझीलंड व पाकिस्तानविरुध्दचे सामने गमावले होते. भारतीय संघाने दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद पटकावले 2011 मध्ये, मात्र यावेळी आपण दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत झालो होतो तर इंग्लंडविरुध्दचा सामना 'टाय' सूटला होता.
चार वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियन संघाचे जगज्जेतेपदसुध्दा निर्विवाद नव्हते. न्यूझीलंडविरुध्दचा साखळी सामना त्यांनी गमावला होता. त्यानंतर आता यंदाच्या स्पर्धेत रविवारपर्यंत भारतीय संघ अपराजीत होता पण इंग्लंडने त्यांना पहिला पराभव पत्करण्यास भाग पाडले. त्यामुळे यावेळीसुध्दा जो कोणताही संघ विश्वविजेतेपद पटकावेल, तो विश्वविजेता तर असेल पण अपराजित नसेल.
अपराजित राहून विश्वविजेते असे निर्विवाद यश वेस्ट इंडिजने 1975 व 1979,श्रीलंका 1996 आणि ऑस्ट्रेलिया 2003 व 2007 यांनी कमावले आहे.