साऊदमप्टन : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होऊन जवळपास एक आठवडा झाल्यानंतर स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या भारतीय संघाचा पहिला सामना बुधवारी खेळवला जाणार आहे. त्यामुळेच सध्या भारतीय चाहते ‘अपना टाईम आ गया!’ असे म्हणत सज्ज झालेत टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी....
कोट्यवधी चाहत्यांच्या अपेक्षापूर्तीसाठी खेळणाऱ्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा १२ व्या विश्वचषकाचा प्रवास बुधवारपासून दी रोज बाऊल स्टेडियमवर सुरू होत आहे. भारताकडे मॅचविनर्सची उणीव नाही. त्यातील पहिले नाव कोहलीचेच आहे. पण २०११ ला महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात खेळलेल्या संघातील स्टार्स सध्याच्या संघात दिसत नाहीत. त्यावेळी सचिन, सेहवाग, युवराज सिंग, गौतम गंभीर, झहीर खान आणि हरभजन सिंग यांच्यासोबतीला मुनाफ पटेल, आशिष नेहरा, सुरेश रैना आणि युवा कोहली होता. सध्याच्या संघात कोहलीचा मार्गदर्शक धोनी आहे. या संघाने मागील नऊपैकी सहा सामने जिंकले असून भारताला जेतेपदाचा प्रबळ दावेदारसमजले जाते.
२०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून झालेल्या पराभवानंतर भारताची विश्वचषकाची तयारी सुरू झाली. येथे दाखल झाल्यापासून संघाला बरीच विश्रांती मिळाली. दुसरीकडे द. आफ्रिका सलामी सामन्यात इंग्लंड आणि बांगलादेशकडून पराभूत झाला आहे. वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी आणि डेल स्टेन दुखापतग्रस्त असल्याने भारताविरुद्ध खेळणार नाही. पण कितीही संकटे असली तरी द. आफ्रिकेला सहजपणे घेणे भारताला परवडणारे नाही. त्यामुळेच मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आपल्या खेळाडूंना जमिनीवर राहण्याचा सल्ला दिला.
गवत नसल्याने खेळपट्टी फलंदाजांसाठी पूरक ठरेल, असे मानले जाते. हवामान खात्यानेही ढगाळ वातावरणाची तसेच पाऊस पडण्याची शंका व्यक्त केली आहे. अशावेळी कासिगो रबाडाचा वेगवान मारा भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतो. रोहित शर्मा आणि शिखर धवन या सलामीवीरांना रबाडाचे चेंडू सावधपणे खेळावे लागतील. धोकादायक सलामीवीर रोहित शर्माचा कमकुवतपणा ओळखून कर्णधार फाफ डुप्लेसिस फिरकीपटू इम्रान ताहिरकडून सुरुवात करून घेऊ शकतो. दोन्ही सराव सामन्यांमध्ये भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना लौकिकास साजेशी खेळी करता आलेली नव्हती. त्यामुळे आफ्रिकेविरुद्ध त्यांच्यावर काहीसे दडपण असू शकते. त्याचवेळी आफ्रिकेला धडाकेबाज एबी डिव्हिलियर्सची फारच उणीव भासत आहे.
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, केदार जाधव, विजय शंकर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, दिनेश कार्तिक आणि रवींद्र जडेजा.
द. आफ्रिका : फाफ डुप्लेसिस (कर्णधार), क्वींटन डीकॉक, एडेन मार्करम, हाशिम अमला, जेपी ड्युमिनी, डेव्हिड मिल्लर, कागिसो रबाडा, ड्वेन प्रिटोरियस, एंडिले फेलुक्वायो, तबरेज शम्सी, इमरान ताहिर, क्रिस मॉरिस, आणि रॉसी वान डेर डुसेन.
टीम इंडियाचा तिसरा वेगवानगोलंदाज भुवनेश्वर असेल का? रवींद्र जडेजासह कुलदीप व युझवेंद्र चहल यांनाही संधी मिळेल? केदार जाधव की विजय शंकर, कुणाची वर्णी लागेल, हे पाहणे रंजक ठरेल. चौथ्या स्थानी लोकेश राहुल खेळेल. धोनीने बांगलादेशविरुद्ध सराव सामन्यात शतक ठोकले होते. त्याने ती लय कायम ठेवावी, अशी सर्वाची अपेक्षा असेल.
हा सामना दी रोज बाउल स्टेडियममध्ये होईल. हे स्टेडियम २००१ साली स्थापन झाले असून इंग्लिंश कौंटी संघ हॅम्पशायरचे हे घरचे मैदान आहे. या स्टेडियमवर याआधी एकही विश्वचषक सामना झाला नव्हता, मात्र यंदा येथे एकूण ५ सामने खेळविण्यात येतील. भारतीय संघ येथे दक्षिण आफ्रिका संघासह अफगाणिस्तान संघाविरुद्धचा सामनाही खेळेल.
या स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीस पोषक मानली जाते. २०१७ सालापासून येथे सर्वात कमी धावसंख्या २८८ धावा अशी असून सर्वोत्तम धावसंख्या ३ बाद ३७३ अशी आहे. गेल्या महिन्यात इंग्लंडने पाकविरुद्ध ३ बाद ३७३ धावा कुटल्या होत्या. यावेळी पाकनेही ७ बाद ३६१ धावांची मजल मारली होती.