लीड्स, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : रोहित शर्माची बॅट वर्ल्ड कप स्पर्धेत सध्या चांगलीच तळपत आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक पाच शतकांचा विक्रम त्याच्या नावावर आहे आणि वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे. शिवाय वर्ल्ड कप स्पर्धेतील त्याचे हे एकूण सहावे शतक ठरले आहे आणि त्यानं महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये रोहितनं 647 धावांसह अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. रोहितच्या या यशामागे सिक्सर किंग युवराज सिंगचा महत्त्वाचा वाटा आहे. हे खुद्द रोहितनंच सांगितलं आहे.
2011च्या वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वीही युवराज अशाच परिस्थितीतून गेला होता, त्यामुळे युवराजचं मार्गदर्शन कामी आल्याचं रोहितनं सांगितलं. ''आयपीएलदरम्यान आम्ही खेळांविषयी चर्चा करायचो. 2011च्या वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी त्याच्याही बॅटीतून धावांचा ओघ आटला होता. पण, वर्ल्ड कपमध्ये त्यानं दमदार कामगिरी केली. त्यानं जे काही सांगितले, त्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली,'' असे रोहित म्हणाला.यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील तुझा विश्वविक्रम कायम राहिल का, या प्रश्नावर रोहित म्हणाला,''आम्ही वर्ल्ड कप जिंकल्यास हा विश्वविक्रम कायम राहिल. पण, नाही जिंकल्यास, त्या विश्वविक्रमाला काहीच अर्थ राहणार नाही.''
रोहितची नैसर्गिक फलंदाजी आनंददायीभारतीय संघाने अखेरच्या साखळी सामन्यात श्रीलंकेविरुद्ध अपेक्षेप्रमाणे वर्चस्व गाजवले आणि मंगळवारी न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या उपांत्य लढतीपूर्वी मनोधैर्य उंचावणारा विजय नोंदवला. श्रीलंका संघाने चार विकेट झटपट गमावल्यानंतर लढत लवकर संपेल अशी अपेक्षा होती, पण अनुभवी अँजेलो मॅथ्यूजने जबाबदारीपूर्ण खेळी केली. भारतीय संघाच्या आघाडीच्या फळीचा फॉर्म बघता २६४ धावा पुरेशा नव्हत्या. त्यात रोहित शर्माचा सध्याचा शानदार फॉर्म बघितल्यानंतर तर नक्कीच हे लक्ष्य कमीच होते.
रोहितला नैसर्गिक फलंदाजी करताना बघून आनंद झाला. द्विपक्षीय मालिकेत एकाच प्रतिस्पर्ध्याविरुद्ध पाच शतके झळकावणे अशक्य असते आणि रोहितने विश्वकप स्पर्धेत वेगवेगळ्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध प्रतिकूल वातावरणात शतके झळकावत धावांची भूक असल्याचे सिद्ध केले आहे. तो प्रत्येक डावात जुन्या खेळीचा विचार न करता नव्याने सुरुवात करतो. आत्मविश्वास आणि आत्ममश्गुल यात फार थोडा फरक आहे आणि रोहितला त्याची चांगली कल्पना आहे.
रोहितची सहजसुंदर फटकेबाजी चाहत्यांना आनंद देणारी ठरते. माझ्यासाठी त्याची फलंदाजी म्हणजे लयबद्ध कविता असून विश्वकप स्पर्धेसाठी ठेवणीतून काढली असल्याचा अनुभव आहे. के. एल. राहुलसोबत सलामीला फलंदाजी करताना त्याची भूमिका बदलली, पण त्यामुळे त्याच्या खेळावर परिणाम झाला नाही.
शिखर धवनच्या साथीने खेळताना रोहित आपल्या डावाची बांधणी करण्यासाठी पुरेसा वेळ घेत होता. कारण शिखर आक्रमक खेळत होता. त्या तुलनेत राहुल आघाडीच्या फळीत सावधगिरी बाळगत खेळत असल्याचे दिसून येते. त्यामुळे रोहितला आक्रमक भूमिका स्वीकारावी लागते. त्यामुळे त्याच्या सहकाºयाला डावाची बांधणी करण्याची संधी मिळते. रोहितच्या कामगिरीपासून राहुलही बोध घेईल, अशी आशा आहे. राहुलची स्वत:ची शैली आहे. अखेर त्याने शतकी खेळी केली. उपांत्य फेरीच्या लढतीपूर्वी अशी कामगिरी होणे म्हणजे ‘सोने पे सुहागा’.
सलग तीन सामने गमावल्यानंतर उपांत्य फेरीत खेळणाºया न्यूझीलंड संघाला भारतीय संघ कमी लेखण्याची चूक करणार नाही. न्यूझीलंड संघाबाबत एक प्रामुख्याने उल्लेख करता येईल, हा संघ कधीच संधी गमावत नाही. विश्वकप स्पर्धेत त्यांची सांघिक कामगिरी दिसून येते आणि पुनरागमन करण्यातही ते सक्षम आहेत, याची विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने नोंद घ्यायला हवी. भारतीय संघ कुठला संघ खेळवतो याबाबत उत्सुकता आहे. भारत सहा गोलंदाजांचा पर्याय वापरतो की अतिरिक्त फलंदाज खेळवतो, याची उत्सुकता आहे.