ICC World Cup 2023 : टीम इंडिया वन डे वर्ल्ड कपच्या तयारीत व्यग्र आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ३ सामन्यांची वन डे मालिका २७ जुलैपासून सुरू होत आहे. या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी निवड समिती प्रमुख अजित आगरकर विंडीज दौऱ्यावर पोहोचणार आहे. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचा संघ आणि भविष्याचा रोडमॅप यावर आगरकर कर्णधार रोहित शर्मा व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी चर्चा करणार आहे. याच बैठकीत ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचे भारतीय संघातील २० शिलेदारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
भारतीय संघाला २०११ पासून वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही, तर २०१३ नंतर भारताने एकही आयसीसी स्पर्धा जिंकलेली नाही. त्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये भारताने दोन वेळा धडक मारली, परंतु उपविजेतेपदावरच त्यांना समाधानी रहावे लागले. यंदाचा वर्ल्ड कप भारतात होतोय आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ बाजी मारेल असा अनेकांना विश्वास आहे. ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत हा वर्ल्ड कप होणार आहे. २०१९ च्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर टीम इंडियाने ४७ खेळाडूंना वन डे संघात संधी दिली आणि त्यापैकी २० खेळाडू वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडले जाण्याची शक्यता आहे.
BCCI ने नुकतीच आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आणि त्यात यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, जितेश शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंग आदी आयपीएल गाजवणाऱ्या युवा खेळाडूंना संधी दिली गेली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यानच ही स्पर्धा होणार असल्याने या संघातील खेळाडूंचे वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणे अशक्यच आहे. त्यात जसप्रीत बुमराह, केएल राहुल, श्रेयस अय्यर यांच्या तंदुरुस्तीवरही बरंच गणित अवलंबून आहे.
वर्ल्ड कप स्पर्धेनंतर ९ युवा खेळाडूंना वन डे संघात खेळण्याची संधी मिळाली. त्यात ऋतुराज गायकवाड, राहुल चहर, शिवम दुबे, कृष्णप्पा गौतम, नितीश राणा, रवी बिश्नोई, चेतन साकारिया, कुलदीप सेन आणि जयंत यादव यांचा समावेश आहे. आर अश्विन, टी नटराजन आणि व्यंकटेश अय्यर यांनाही वन डेत खेळवले गेले. मागील ४ वर्षांत विराटने सर्वाधिक ३८ वन डे सामने खेळले आणि त्यात ५ शतकं व ११ अर्धशतकांच्या मदतीने १६१२ धावा केल्या. शिखर धवन जो सध्या संघाबाहेर आहे त्याने ३७ वन डे सामन्यांत ४१च्या सरासरीने १३१३ धावा केल्या. कुलदीप यादवने या कालावधीत ३०, शार्दूल ठाकूरने ३० सामने खेळून अनुक्रमे ४१ व ४४ विकेट्स घेतल्या.
वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचे संभाव्य शिलेदार - रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, इशान किशन, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिखर धवन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, यशस्वी जैस्वाल.