यंदाची आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा भारतात खेळवली जाणार आहे. या स्पर्धेचं वेळापत्रक अद्याप प्रसिद्ध झालेलं नाही. यादरम्यान, आयसीसीने रविवारी फॅन्ससाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. दरम्यान, ही स्पर्धा ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात खेळवली जाणार आहे.
सध्या वर्ल्डकपच्या मुख्य फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी वर्ल्डकप २०२३ क्वालिफायर सामने खेळवले जात आहे. हे सामने १८ जून ते ९ जुलैदरम्यान खेळवले जातील. क्वालिफायरचा पहिला सामना नेपाळ आणि झिम्बाब्वे यांच्यात आहे. वर्ल्डकप क्वालिफायरमध्ये एकूण १० संघ सहभागी होणार आहेत. त्यामधून दोन संघ वर्ल्डकपच्या मेन राऊंडमध्ये प्रवेश करतील.
यादरम्यान, आयसीसीने रविवारी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे, त्यामुळे फॅन्स खूश होऊ शकतात. आयसीसी वर्ल्डकपच्या ट्विटर पेजवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यात म्हटलंय की, स्पर्धेचं पूर्ण वेळापत्रक हे लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर एक क्रीडा नियतकालिकाने दिलेल्या वृत्तानुसार वर्ल्डकपचं वेळापत्रक पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.
बीसीसीआयने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यादरम्यान, एक प्रस्ताव ठेवला होता. यामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्याबाबत चर्चा झाली होती. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्याचे नियोजित होते. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने याबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यास उशीर होत आहे.